29 May 2020

News Flash

मंदीच्या फेऱ्यात, गडय़ा आपुला गाव बरा!”

तीन महिन्यांपूर्वी वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये आपली मालमोटार १९ दिवसांपासून एकाच ठिकाणी उभी असल्याने मोहन शेलार वैतागले होते.

|| सुहास सरदेशमुख

औद्योगिक वसाहतींमधील अकुशल मजूर काम नसल्याने पुन्हा शेतीकडे :- मंदीच्या फेऱ्यात अडकलेल्या औद्योगिक वसाहती हळूहळू सावरत असल्याचा दावा करण्यात येत असला तरी शहरांतील औद्योगिक वसाहतींमध्ये कामाच्या आशेने गेलेले ग्रामीण अकुशल मजूर काम नसल्याने पुन्हा गावाकडे परतू लागले आहेत.

लागोपाठ दुसऱ्या तिमाहीत विकासदरात घट नोंदवण्यात आल्याने मंदीच्या झळा सोसणारी माणसे गेली कोठे याचा शोध ‘लोकसत्ता’ने घेतला असता औद्यागिक वसाहतींमधील चित्र अजूनही फारसे सुधारले नसल्याचे आढळले. सणांच्या निमित्ताने दुचाकी आणि चार चाकी गाडय़ांची विक्री झाली, मात्र त्याचा उत्पादन वाढीवर फारसा परिणाम झाला नाही. मंदीचे चाक जागच्याजागीच फिरत असल्याची व्यथा उद्योजक मांडत आहेत.

तीन महिन्यांपूर्वी वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये आपली मालमोटार १९ दिवसांपासून एकाच ठिकाणी उभी असल्याने मोहन शेलार वैतागले होते. मात्र, काही दिवसांपासून शेतमाल आणि औद्योगिक वसाहतींमधील मालाची ने-आण करण्याचे काम त्यांना मिळू लागले आहे. हळूहळू चाक रुळावर येत असल्याचे शेलार सांगतात.   विविध क्षेत्रांतील कंपन्यांच्या उत्पादनात तीन महिन्यांत फारशी वाढ झाली नाही. त्यामुळे अकुशल कामगारांना काम मिळणे अवघड झाले. औद्योगिक वसाहतींमध्ये रोजगारासाठी आलेल्या बेरोजगारांबाबतचा वृत्तांत ‘लोकसत्ता’ने तीन महिन्यांपूर्वी प्रसिद्ध केला होता.

मंदीचा फेरा अजूनही कायम आहे. या अनुषंगाने ‘सीआयआय’ या औद्योगिक संघटनेचे पदाधिकारी एन. श्रीराम म्हणाले, ‘मोटारनिर्मिती आणि बांधकाम क्षेत्रात मंदीची स्थिती अजूनही आहे. मात्र, परिस्थिती हळूहळू सुधारते आहे.’

कामगार आयुक्त कार्यालयाच्या मते मंदीसदृष्य वातावरण पूर्वीही नव्हते आणि आजही नाही. एकाही कंपनीतून कामगारांना काढले जात नाही, असा दावाही कामगार आयुक्त कार्यालय करीत असले तरी प्रत्यक्षात हजारो कामगारांना काढण्यात आले आहे. त्यांतील अकुशल मजूर आता गावाकडे परतू लागले आहेत. त्यांची संख्या लक्षणीय आहे.

पुन्हा शिवाराची वाट

बदनापूर तालुक्यातील सांडू जाधव २९ ऑगस्टला औरंगाबादच्या वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये आले होते. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना काम मिळत नसल्याने त्यांच्यापुढे जगण्याची भ्रांत निर्माण झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. उदरनिर्वाह करता येईल, एवढी मजुरी देणारे काम त्यांना मिळाले नाही. त्यामुळे ते पुन्हा गावी परतले. आता जाधव यांची दोन्ही तरुण मुले आणि सुना कापूस वेचणीसाठी मजूर म्हणून, तर सांडू जाधव सालगडी म्हणून काम करू लागले आहेत. शेतीसंकटाला कंटाळून जाधव औद्योगिक वसाहतींकडे मोठय़ा आशेने गेले होते, परंतु त्यांना पुन्हा शिवाराकडे परतावे लागले आहे. यावरून औद्योगिक मंदीचे स्वरूप लक्षात येते.

अजूनही मालवाहतुकीचे प्रमाण ४० टक्के कमी आहे. शेतीमधील मालांची खरेदी – विक्रीचे व्यवहार सुरू असल्याने मालमोटारी रस्त्यावर दिसतील. पण मंदीसदृष्य स्थिती कायम आहे. त्यात नव्याने विम्याची रक्कम वाढल्याने नफ्याऐवजी नुकसानच अधिक होत आहे. औरंगाबाद शहरातून साधारणत: साडेचार हजार मालमोटारींची वाहतूक होते. त्यातील ४० टक्के वाहतूक अजून पूर्वपदावर आलेली नाही. – फैयाज अब्बास, अध्यक्ष, ट्रान्सपोर्ट असोसिएशन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2019 2:38 am

Web Title: due to unskilled labor in industrial estates again to agriculture akp 94
Next Stories
1 तुळजाभवानी दागिन्यांच्या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश
2 मोटार अपघातात जालन्यातील चार तरुणांचा मृत्यू
3 विखे कारखाना कर्जप्रकरण : पोलीस अहवालाच्या विरोधात दाद मागण्याची मुभा
Just Now!
X