औरंगाबाद : करोना विषाणूचा संसर्ग होऊन रुग्णसंख्येचा आलेख चढता असून परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. सरकार, प्रशासनातील आरोग्यासह इतरही यंत्रणांवर कामाचा प्रचंड भार वाढून अधिकारी, कर्मचाऱ्यांची झोप उडत असताना आरोग्य विभागाचीच एक शाखा असलेल्या कक्षाकडील कामाचा व्याप काहीसा हलका झाला आहे. तो विभाग म्हणजे शवविच्छेदनाचा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) शवविच्छेदन विभागात जिथे दररोज १० ते १२ मृतदेहांची उत्तरीय तपासणी केली जायची तिथे आज हा आकडा तीन किंवा चारवरच आला आहे.

औरंगाबादचे घाटी रुग्णालय मराठवाडा, विदर्भातील बुलडाणा, उत्तर महाराष्ट्रातील धुळे-नंदूरबार व अहमदनगर जिल्ह्य़ांतील रुग्णांसाठी महत्त्वाचे उपचारकेंद्र आहे. उपचारादरम्यान एखाद्याचा मृत्यू झाला तर मृतदेहाची उत्तरीय तपासणीही येथेच केली जाते. दररोज साधारण १० ते१२ मृतदेहांचे विच्छेदन येथे केले जाते. अनेक वेळा हा आकडा वाढलेलाही असतो. महिन्याकाठी ३०० च्या आसपास तर वर्षांकाठी साडेतीन ते चार हजारांपर्यंतचा हा आकडा असतो. करोनाच्या पार्श्वभूमीवर घाटीतील अनेक डॉक्टरांना स्वसंरक्षित साहित्याअभावी उपचार करावे लागत असल्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर आता त्यांना काही प्रमाणात मास्क, एन-९५ मास्क आदी साहित्यांचा पुरवठा करण्यात आला. याचवेळी करोनाने मृत्यू पावलेल्यांची उत्तरीय तपासणी करायची ठरली तर शवविच्छेदन विभागातील डॉक्टर, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्याही आरोग्याचे काय, असा प्रश्न निर्माण झाला. या दरम्यान, औरंगाबादमध्येही एका करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. याच दरम्यान, सरकारने करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाचे शवविच्छेदन करायचे नाही, असा निर्णय घेतला. शिवाय अन्य उपचारादरम्यान मृत्यू पावलेल्यांचेही विच्छेदन करायचे नाही, असेही सूचित केले. त्यामुळे घाटीतील शवविच्छेदन विभागात आता केवळ घातपाताचा संशय असलेले, गळा दाबून अथवा अन्य प्रकारातील खुनाच्या घटनांमधील मृतदेहांची उत्तरीय तपासणी करण्यात येत आहे. अशा घटनेतील मृतदेह दिवसाकाठी तीन-चारच येत असल्याची माहिती या विभागातील डॉ. तारीक अली यांनी सांगितली. प्रोफेसर, सहायक प्रोफेसर, कर्मचारी, असा चमू असल्याचे ते म्हणाले.

शवविच्छेदनाचा आकडा कमी

करोनाच्या पार्श्वभूमीवर शवविच्छेदनाबाबत शासनाने एक परिपत्रक काढून काही सूचना केलेल्या आहेत. करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाची उत्तरीय तपासणी करायची नाही. याशिवाय एखाद्याच्या मृत्यूचे कारण सुस्पष्ट असेल तरी त्याचप्रमाणे सूचनांचे पालन करायचे आहे. केवळ अपघात, घातपात, पोलिसांना संशय असलेल्या मृतदेहांचेच शवविच्छेदन करण्यात येत आहे. सध्या दिवसभरात तीन ते चारच मृतदेहांची उत्तरीय तपासणी केली जाते. यापूर्वी १० ते १२ मृतदेह यायचे. उत्तरीय तपासणीसाठी आमच्या विभागातील चमूला आवश्यक त्या सुविधा उपलब्ध असून करोनाच्या पार्श्वभूमीवर काही साहित्याची मागणीही केलेली आहे.

– डॉ. कैलास झिने, शवविच्छेदन विभाग प्रमुख, घाटी.