लोकसभा निवडणूक लढविण्यास उत्सुक असून भाजप-सेनेची युती झाली तर दक्षिण मुंबईतून निवडणूक लढविण्यास प्राधान्य असेल. जर युती झाली नाही तर विदर्भातील रामटेक मतदारसंघातून उमेदवार व्हायला आवडेल, असे केंद्रीय समजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. रामटेक मतदारसंघाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा झाल्याचेही ते म्हणाले. भाजप समवेतच निवडणूक लढविणार असल्याच्या घोषणेचा पुनरुच्चार त्यांनी केला.

केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या मताशी सहमत नसल्याने अ‍ॅट्रॉसिटी संदर्भात दिलेल्या निर्णयाच्या विरोधात पुनर्विलोकन याचिका दाखल करण्यात आली आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पुढाकार घेतल्याचे सांगत आठवले यांनी केंद्र सरकार दलित विरोधी नसल्याचे पत्रकारांना आवर्जून सांगितले.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून राहुल शेवाळे निवडून आलेले आहेत. याच मतदारसंघात पूर्वी निवडून आलो होतो. त्यामुळे या मतदारसंघास प्राधान्य असेल, असे आठवले म्हणाले. पण युती झाली नाही तर रामटेक मतदारसंघ योग्य राहील, अशी चर्चा झाल्याचे त्यांना सांगितले. दलित ऐक्य जवळ दिसत नसल्याचे सांगत ऐक्य हवे असे म्हणणारे कार्यकर्तेच रोज फुटतात. पण ऐक्य होणारच असेल तर जी जबाबदारी दिली जाईल, ती स्वीकारण्यास तयार असल्याचे आठवले म्हणाले. आपला पक्ष भाजपबरोबर आहे. पण आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबरोबर नाही असे सांगणाऱ्या आठवले यांनी संघाने मा. गो. वैद्य यांनी घेतलेल्या आरक्षण भूमिकेस विरोध असल्याचे पत्रक काढल्याचेही आवर्जून सांगितले.