दोन बँकांकडून शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्जवाटप

गृहसचिव व लातूर, उस्मानाबादच्या पोलीस अधीक्षकांना नोटिसा

कर्जाची मागणी न करताच औसा तालुक्यातील गाडेवाडी येथील शेतकरी संगप्पा बोमणे यांना उस्मानाबादच्या ‘इको’ बँकेने व सोलापूरच्या ‘कॅनरा’ बँकेने कर्ज दिल्याचे दाखवून ती रक्कम परस्पर अन्य खात्याकडे वळविली. दोन वर्षांनी कर्जखात्यात पुन्हा रक्कमही तिसऱ्याच माणसाने भरली. शेतकऱ्याच्या सहमतीशिवाय झालेल्या या परस्पर व्यवहारावर आक्षेप घेत दाखल करण्यात आलेल्या याचिकेत गृहसचिव, दोन्ही बँकांचे व्यवस्थापक, लातूर व उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे व न्या. एस. एस. पाटील यांनी नोटिसा बजावल्या आहेत.

कोणत्या खात्यासाठी कर्ज घेतले होते आणि कोणत्या खातेधारकांनी ते परत केले, याची माहिती मागूनही याचिकाकर्त्यांना ती देण्यात आली नाही.

मात्र, कॅनरा बँकेने दिलेल्या कर्ज तपशीलाच्या विवरणपत्रावरील दूरध्वनीवर संपर्क साधला असता तो क्रमांक ‘लोकमंगल-लोहारा’ या नावे असल्याचे याचिकाकर्त्यांने सांगितले. न्यायालयात दाखल झालेल्या या याचिकेतील तपशिलामुळे ‘लोकमंगल कर्ज’ प्रकरणाला नवे वळण लागण्याची शक्यता आहे.

दाद नाहीच

औसा तालुक्यातील गाडेवाडी येथे साडेआठ हजार हेक्टर शेतीचे मालक असणाऱ्या संगप्पा बोमणे यांनी ‘आयसीआयसीआय’ बँकेत कर्ज घेण्यासाठी अर्ज केला होता. तेव्हा तुमच्या नावे कर्ज असल्याचे त्यांना कळविण्यात आले.

उस्मानाबादच्या इको बँकेतून १ लाख रुपये व कॅनरा बँकेतून २ लाख ८२ हजार ६६२ रुपये कर्जखाती जमा असल्याचे कळविण्यात आले. अशा प्रकारचे कोणतेही कर्ज आपण घेतले नाही, असा दावा करत ज्या खात्यावर कर्ज रक्कम जमा झाली आहे, त्याचा तपशील बोमणे यांनी बँकेच्या व्यवस्थापकास मागितला. तो त्यांना उपलब्ध करून देण्यात आला नाही. शेवटी माहितीच्या अधिकारात त्यांनी अर्ज केले. त्यालाही बँक व्यवस्थापकांनी दाद दिली नाही. कॅनरा बँकेने व्यवहाराचा तपशील कळविला. त्यात खाते क्र. ०३१०१०१०२५७६१ या खात्यावर २०१३ मध्ये रक्कम हस्तांतरित झाल्याचे सांगण्यात आले. या तपशिलाच्या आधारे हे बँक खाते कोणाचे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न शेतकऱ्याने केला. मात्र, तो त्याला शेवटपर्यंत उपलब्ध होऊ शकला नाही.

दरम्यान, कोणीच दाद देत नसल्याने या प्रकरणाची तक्रार लातूर पोलीस अधीक्षक व औसाच्या पोलीस निरीक्षकांकडे बोमणे यांनी केली होती. मात्र, त्यालाही कोणी दाद दिली नाही. कोणी परस्पर कसे कर्ज घेतले आणि ते जमाही कसे केले, याची माहिती उपलब्ध न झाल्याने आणि आवश्यकता असताना कर्ज न मिळाल्याने बोमणे यांनी अ‍ॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत खंडपीठात याचिका सादर केली.

  • औसा तालुक्यातील गाडेवाडी येथे साडेआठ हजार हेक्टर शेतीचे मालक असणाऱ्या संगप्पा बोमणे यांनी ‘आयसीआयसीआय’ बँकेत कर्ज घेण्यासाठी अर्ज केला होता. तेव्हा तुमच्या नावे कर्ज असल्याचे त्यांना कळविण्यात आले.
  • या प्रकरणी उच्च न्यायालयाने गुन्हा का दाखल झाला नाही, अशी विचारणा केली. या विषयी बोलताना याचिकाकर्ते बोमणे म्हणाले की, बँकेतून मिळालेल्या विवरण पत्रावर ज्यांनी आमच्या नावे कर्ज घेतले होते, त्यांचा दूरध्वनी क्रमांक मिळाला. त्यावर संपर्ककरता तो उस्मानाबाद जिल्ह्य़ातील लोहारा तालुक्यातील लोकमंगल साखर कारखान्याचा असल्याचे समजले.
  • तत्पूर्वी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. मात्र, कोणी तपास केला नाही.