बिपीन देशपांडे

ठोक बाजारात किलोमागे ३ ते ५ रुपये, तर किरकोळ दुकानांत ५ ते १० रुपयांनी महाग

टाळेबंदीनंतरच्या परिस्थितीमुळे सर्वसामान्य गृहिणींचे आर्थिक गणित काहीसे कोलमडले असतानाच आता त्यांना ऐन सणासुदीच्या महिन्यातच खाद्य तेलाच्या दरवाढीचे चटके सहन करावे लागत आहेत. खाद्य तेलाच्या दरात ठोक बाजारात किलोमागे ३ ते ५ रुपयांची तर किरकोळ  दुकानांमध्ये ५ ते १० रुपयांची वाढ झालेली आहे.

औरंगाबाद येथील मोंढय़ातील तेल व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पामतेल हे मलेशियातून येते. पामतेलाचा प्रमुख ग्राहक हा गरीब, सर्वसामान्य माणूस आहे. पामतेलाची किंमत किलोमागे ९० रुपयांपर्यंत आहे.

तेलाचे व्यापारी संजय कांकरिया यांनी सांगितले की, पामतेलावर आयात शुल्क लावलेले असते. जीएसटी व आयातशुल्क मिळून भावात साधारण १२ टक्के वाढ झालेली असते. ८० रुपयांपर्यंतचे पामतेल १० रुपयांनी वाढ होऊन विक्री होते. अलिकडे आयातशुल्क वाढलेले नसले तरी वाहतुकीच्या खर्चातही वाढ झालेली आहे.

किराणा मालाचे किरकोळ विक्रेते रमेश कौलवार यांनी सांगितले की, शेंगादाणा तेलाच्या भावात किलोमागे ४ रुपयांपर्यंतची वाढ झालेली आहे. सध्या शेंगादाणा तेलाची किंमत १५० रुपये किलोपर्यंत आहे. सोयाबीन, सूर्यफुल या खाद्य तेलाचा भाव १०० रुपये आहे. पामतेल ९० रुपये किलो आहे.

करोनाच्या टाळेबंदी परिस्थितीनंतर आयातशुल्क वाढवलेले नाही. अर्जेटिना आणि मलेशिया या दोन देशांमध्ये तेलबियांपासून बायोडिझेल निर्मिती करण्याची प्रक्रिया वाढलेली आहे. उत्तर भारतात मोहरीचे दरही वाढलेले आहेत. मोहरीचे दर ४ हजार ४०० ते ५ हजार १०० रुपयांपर्यंत गेले आहेत. सोयाबीनचेही दर वाढलेले आहेत. परिणामी तेलभावामध्ये ३ ते ५ रुपयांपर्यंत वाढ झालेली आहे.

– पाशा पटेल, माजी अध्यक्ष, राज्य कृषी मूल्य आयोग