16 September 2019

News Flash

जायकवाडीचे आठ दरवाजे उघडले

पाच हजार ७८१ क्युसेकने विसर्ग

(संग्रहित छायाचित्र)

जायकवाडी प्रकल्पातील आठ दरवाजे गुरुवारी रात्रीपर्यंत अर्धा फुटाने उचलण्यात आले असून त्यातून शुक्रवारी सकाळपासून ५ हजार ७८१ क्युसेकने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी ६ नंतर आणि रात्री दहानंतर परिस्थितीत बदल होऊ शकेल, असेही सांगण्यात आले.

नाशिक परिसरात झालेल्या पावसानंतर जायकवाडीचे धरण ९२ टक्क्य़ांवर भरले असून त्यातून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग होत आहे. १५ ऑगस्टच्या दिवशी सकाळी २, दुपारी २, रात्री ४ असे मिळून दरवाजा क्रमांक १०, १४, १६, १८, १९, २१ व २३ हे उघडण्यात आले आहेत. पैठण जलविद्युत केंद्रामधून एक हजार ५८९ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.  नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या पाश्र्वभूमीवर पैठण तालुक्यातील सतरा गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून प्रशासनाकडून सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात आल्याची माहिती पैठणचे तहसीलदार महेश सावंत यांनी सांगितले. दरम्यान, औरंगाबादसह जालना, परभणी, बीड आदी जिल्ह्य़ातील नदीपात्रालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. जायकवाडी धरणाची पातळी एक हजार ५२० फूट तर ४६३.४४८ मीटर आहे. एकूण पाणीसाठी २७३१.७९२ दलघमी तर जिवंत पाणीसाठा १९९३.६८६ दलघमी आहे. धरणाची टक्केवारी ९१.८३ एवढी असून उजव्या कालव्यातून ९०० क्युसेकने, तर डाव्या कालव्यातून १४०० क्युसेकने विसर्ग होत आहे. पैठण जलविद्युत केंद्रामधून १५८९ क्युसेक, तर सांडव्यातून चार हजार १९२, असा दोन्ही मिळून पाच हजार ७८१ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असल्याची माहिती धरण परिसरातील सूत्रांनी दिली.

First Published on August 17, 2019 12:44 am

Web Title: eight doors of jaikwadi opened abn 97