महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांची तक्रार; तिघे कारागृहात

औरंगाबाद : माहितीच्या आधाराखाली महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांना बदनामी करण्याची धमकी देत आठ लाखांची खंडणी  मागण्यात आली होती. या रकमेपैकी १६ हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडलेल्या तिघांना मंगळवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी.एच. जोशी यांनी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले.

उदय अरुणराव पालकर, भानुदास शंकर मोरे व अमोल सांडू साळवे अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात मिलकॉर्नर येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे मुख्य अभियंता सुरेश लक्ष्मण गणेशकर यांनी तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून उदय पालकर याने वीज कंपनीच्या कार्यालयात माहिती अधिकाराखाली अर्ज करून विविध कामांची माहिती मागत गणेशकर यांना बदनामी करण्याची धमकी दिली. पालकर व त्याचे साथीदार भानुदास मोरे व अमोल साळवे यांनी आठ लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार गणेशकर यांनी सिडको पोलीस ठाण्यात नोंदविली. पोलिसांनी सापळा रचून तिघा आरोपींना १६ हजार रुपयांची खंडणी स्वीकारताना रंगेहात पकडले.

तिघा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता सहाय्यक सरकारी वकील ए. व्ही. घुगे यांनी आरोपींना माहितीच्या अधिकाराखाली मागवलेली माहिती जप्त करणे आहे. खंडणी मागण्यासाठी आरोपींना आणखी कोणी मदत केली का याबाबत तपास करणे असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती.

ही विनंती मान्य करून न्यायालयाने आरोपींना २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. मंगळवारी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्या. जोशी यांनी आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.