सहा जण जखमी

मराठवाडय़ातील काही जिल्ह्य़ात शनिवारी दुपारी झालेल्या वादळीवारे व विजांच्या कडकडाट झालेल्या पावसात आठ जणांचा मृत्यू झाला. बीडमधील धारूर तालुक्यात पाच जणांचा मृत्यू तर पाच जण वीज जवळून गेल्याने भाजून जखमी झाले. माजलगाव, औरंगाबाद व परभणीतील पूर्णा तालुक्यातही वीज पडून एक जण ठार झाला आहे.

बीडच्या धारूर तालुक्यातील चारदरी शिवारात झाडावर वीज पडून पाच जणांचा मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली. चारदरी येथे घागरवाडा शिवाराच्या माळावर शंकर पंढरीनाथ मुंडे यांचे शेत आहे. या शेतात पिवळी व बाजरीचे पीक काढण्यासाठी पंधरा मजूर गेले होते. या वेळी प्रचंड कडकडाटाने आलेली वीज शेतात काम करीत असलेल्यांच्या अंगावर कोसळली. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले. या घटनेत आसाराम रघुनाथ आघाव (वय ३०), उषा आसाराम आघाव (वय २५), दीपाली मच्छिंद्र घोळवे (वय २२), शिवशाला विठ्ठल मुंडे (वय २७), वैशाली संतोष मुंडे या पाच जणांचा मृत्यू झाला. तर सुमन भगवान तिडके (वय ४५), रुक्मिण बाबासाहेब घोळवे (वय ५२), कुसाबाई नामदेव घोळवे (४५), सीताबाई दादासाहेब घोळवे (वय ४५) व सुरेखा आबासाहेब आघाव (वय १७, रा. चारदरी) हे जखमी झाले. सर्व जखमींना खाजगी वाहनाने धारूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून चार जणांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. माजलगाव तालुक्यातील लोणगाव येथे राधाबाई दामोदर कोळपे (वय ४५) या महिलेचा मृत्यू झाला.  औरंगाबाद जिल्ह्य़ातील पैठण तालुक्यात असलेल्या ढाकेफळ येथे रामेश्वर दशरथ शेरे (वय ३१) या तरुणाचा वीज पडून मृत्यू झाल्याची माहिती पैठण औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पायघन यांनी दिली. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील कात्नेश्वर शिवारातील गट क्र. २१४ मध्ये शुक्रवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास अंगावर वीज पडून मंगलाबाई रामराव चापके (वय ३५) या महिलेचा मृत्यू झाला. तर मंगलबाई ज्ञानेश्वर पौळ या जखमी झाल्या. त्यांच्यावर परभणी येथील शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत.  या घटनेचा पंचनामा तलाठी अडागळे यांनी केला. दरम्यान, शनिवारी तहसीलदार श्याम मदनूरकर यांनी कात्नेश्वर गावास भेट देऊन कुटुंबाचे सांत्वन केले. शुक्रवारी सायंकाळी पूर्णा शहर व परिसरात दहा मिनिटे जोरदार पाऊस झाला होता. मराठवाडय़ात शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. औरंगाबाद, उस्मानाबाद, नांदेड आदी जिल्ह्य़ात हलका, मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. औरंगाबादेत विजांचा कडकडाटासह पाऊस झाला. लातूर, नांदेड येथे केवळ पावसाळी वातावरण होते.