19 October 2019

News Flash

औरंगाबादच्या पालकमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंच्या नावाची शिफारस

या निर्णयावर अद्याप उद्धव ठाकरेंकडून शिक्कामोर्तब होणे बाकी आहे, अशी माहिती खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिली.

एकनाथ शिंदे

सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे औरंगाबादचे नवे पालकमंत्री होण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेच्या वरिष्ठांकडून यासाठी शिफारस करण्यात आली असून त्यासाठीच्या हालचाली अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे या निर्णयावर अद्याप उद्धव ठाकरेंकडून शिक्कामोर्तब होणे बाकी आहे, अशी माहिती खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिली.

दिपक सावंत यांचा आरोग्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांनी स्विकारल्यानंतर त्यांचे औरंगाबादचे पालकमंत्रीपद रिक्त झाले आहे. औरंगाबादला नवे पालकमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंना संधी मिळावी अशा हालचाली शिवसेनेच्या वरिष्ठ वर्तुळात सुरु आहेत. एकनाथ शिंदेंना औरंगाबादचे पालकमंत्री केल्यावर शिवसेनेला त्याचा कसा फायदा होईल याविषयी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत असल्याचे सुत्रांनी सांगितले.

रामदास कदम पालकमंत्री असतांना खासदार खैरे आणि कदम यांच्यात लहानसहान विषयावरुन प्रचंड वादावादी होत होती. शहरातील शिवसैनिकांवरही या वादाचे गंभीर पडसाद उमटंत होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंना खैरेंनी विनंती केल्यानंतर औरंगाबादच्या पालकमंत्रीपदासाठी दिपक सावंत यांचा नंबर लागला होता. पण त्यांना फार वेळ औरंगाबादसाठी देता आला नाही.

First Published on January 9, 2019 1:35 am

Web Title: eknath shindes name is recommended for aurangabads guardian ministers post