सुभाष झांबड यांच्या उमेदवारीने अब्दुल सत्तार यांचा राजीनामा

काँग्रेसमध्ये बहुतांश नेत्यांचे ‘उमेदवारीसाठी एक पाऊल मागे,’ असे चित्र दिसत असतानाच शुक्रवारी मध्यरात्री आमदार सुभाष झांबड यांचे नाव उमेदवार म्हणून घोषित झाले. पक्षाच्या या निर्णयानंतर अचानक काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसमध्ये बंडाचा पवित्रा घेतला. पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे सांगत त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे शनिवारी सांगितले.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन शिवसेनेशी फारकत घेत बहुजन जनसुराज्य पक्षाची स्थापना करणारे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना काँग्रेसने उमेदवारी द्यावी, यासाठी जिल्हाध्यक्ष म्हणून सत्तार यांनी काम सुरू केले होते. त्यांनी जाधव यांच्या घरी जाऊन पक्षात येण्याची विनंती केली होती. असे असतानाही सुभाष झांबड यांच्या नावाची उमेदवार म्हणून घोषणा झाल्याने सत्तार चिडले. शनिवारी सकाळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी त्यांनी संपर्क साधून अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे त्यांना कळविल्याचे सत्तार यांनी पत्रकारांना सांगितले. निवडणूक लढण्याबाबत मतदारांची मते जाणून घेण्यासाठी शहरातील आमखास मैदानात एक सभा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान उमेदवारी घोषित झाल्यानंतर  सुभाष झांबड यांनी शहरातील प्रमुख देवस्थानांना भेटी दिल्या.  या पूर्वी त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत यश मिळविले होते. मात्र, लोकसभा निवडणूकपूर्व काँग्रेसने केलेल्या संभाव्य उमेदवारांच्या सर्वेक्षणात ते कमालीचे मागे असल्याचा दावा जिल्हाध्यक्ष आमदार सत्तार यांनी केला होता. आता औरंगाबाद लोकसभेसाठी शिवसेनेकडून खासदार चंद्रकांत खरे आणि सुभाष झांबड या दोन उमेदवारांची नावे जाहीर झाली असली तरी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ‘एमआयएम’कडून कोण उमेदवार हे अद्याप ठरलेले नाही. ही प्रक्रिया सोमवापर्यंत होईल, असे सांगण्यात येत आहे. मात्र, काँग्रेसने घोषित केलेल्या उमेदवारीनंतर काँग्रेसमध्ये बरीच खळबळ सुरू झाली आहे. काँग्रेसचा राजीनामा कोणाकडे दिला असे सत्तार यांना विचारले असता या पूर्वी दिलेला राजीनामा आपण परत घेतलाच नव्हता. तसेच विधानसभा अध्यक्षांकडेही आपण मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान राजीनामा दिला होता. तो मंजूर झालेला नाही. नव्याने राजीनामा देण्याचीही आपली तयारी आहे. दरम्यान ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले. आमदार  सतीश चव्हाण यासाठी उत्सुक होते. मात्र, अखेपर्यंत प्रयत्न करुनही काँग्रेसने औरंगाबादच्या जागेची अदलाबदल न केल्याने चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश मिळाले नाही.

मी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना कळविले आहे. काँग्रेसने एकाही अल्पसंख्यांकाला उमेदवारी दिली नाही. मला औरंगाबाद मतदारसंघ निवडून येण्यासाठी योग्य वाटतो आहे. काँग्रेसचा राजीनामा दिला असल्याने आता मला निवडणूक लढविण्याचे व्यक्तिस्वातंत्र्य आहे.     – अब्दुल सत्तार