निवडणुकीत उतरायचे नसेल तर पक्ष कसा; जलील यांचा सवाल

औरंगाबाद लोकसभेची निवडणूक एमआयएमने लढविली नाही तर पक्षाच्या कार्यकर्त्यांचे जाळे पूर्णत: विस्कळीत होईल. चार महिन्यांनी विधानसभेला सामोरे जायचे आहे. तेव्हा काय करायचे? आणि एकही जागा लढवायची नसेल तर आपण राजकीय पक्ष कसे, असा सवाल एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी अ‍ॅड. असुदोद्दीन ओवेसी यांना केला. त्यामुळे एमआयएममधील मतभेद समोर आले आहेत. कार्यकर्त्यांकडून निवडणूक लढविण्याबाबतचा रेटा असल्याची माहिती ओवेसी यांना दिली आहे. दोन दिवसांत ते या अनुषंगाने निर्णय घेतील, असे अभिप्रेत असल्याचे जलील यांनी सांगितले.

या राजकीय घटनांच्या पाश्र्वभूमीवर आमदार जलील एमआयएममध्ये राहतील की नाही, याविषयीच्या चर्चा सुरू झाल्या. ‘राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजप यांच्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन अद्यापि जशास तसा आहे. त्यांच्याकडे जाण्याचा प्रश्नच नाही.’ असे जलील यांनी स्पष्टपणे सांगितले. मतभेदाची बाब उघडकीस आल्यानंतर प्रमुख  पक्षांनी त्यांना पक्ष बदलण्याविषयीची विनंती करणारे दूरध्वनी केले गेले होते. त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. वंचित बहुजन आघाडीने  जाहीर केलेले उमेदवार माजी न्या. कोळसे पाटील हे कोण, असा प्रश्न जेव्हा एमआयएममधील कार्यकर्ता विचारतो, तेव्हा त्याला उत्तर देणे अवघड जाते. केवळ ते माजी न्यायमूर्ती आहेत म्हणून त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवावे हा कसला निकष, असा प्रश्नही जलील करतात.