नांदेडसह बहुतांश तालुक्यांत प्रस्थापितांना धक्का देत मतदारांनी नव्या उमेदीच्या तरुणांना संधी दिली. शहरालगत असलेल्या पावडेवाडी, मरळकसह अनेक ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेचा प्रवेश झाला असला, तरीही भाजपचे मात्र कुठेही अस्तित्व जाणवले नाही.
जिल्ह्यातील ५५६ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले. मंगळवारी सर्वच ठिकाणची मतमोजणी झाली. अनेक ग्रामपंचायतींच्या निकालाकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून होते. नांदेड शहरालगत पावडेवाडी ग्रामपंचायतीत बंडू पावडे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या पॅनेलने सर्वाधिक ८ जागा मिळवल्या. प्रथमच निवडणूक िरगणात उतरलेल्या शिवसेनेच्या माधव पावडे यांनी ७ जागा जिंकून जोरदार धक्का दिला. या ग्रामपंचायतीत २ अपक्षांनीही बाजी मारली. ग्रामपंचायतीत कोणाची सत्ता येणार याचे भवितव्य अपक्षांच्या हाती आहे. सरपंच व सभापती बंडू पावडे यांच्या पत्नी अर्चना पावडे यांना पराभव पत्करावा लागला.
नांदेडपासून १० किलोमीटर मरळक ग्रामपंचायत निवडणुकीत प्रथमच शिवसेनेने चांगले यश मिळवले. काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या मरळक ग्रामपंचायतीत काँग्रेस समर्थकांना ४, तर शिवसेनेला ५ जागा मिळाल्या. अन्य दोन अपक्ष विजयी झाले. पुयणीत विठ्ठल पावडे यांची मक्तेदारी संपुष्टात आणताना तुकाराम पावडे यांच्या पॅनेलने ८ पकी ७ जागा पटकावून सत्ता काबीज केली. खुरगाव येथे गेल्या २५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या गटाचा पराभव करत संतोष लेंडाळे या तरुणाने मित्रमंडळ स्थापन करून ७पकी ६ जागा पटकावल्या. विजयी सर्व सहा जण तरुण आहेत.
नांदेड शहरालगत ज्या ग्रामपंचायती आहेत, त्यापकी बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेसची एकहाती सत्ता होती, पण आता मात्र अनेक ग्रामपंचायतींत शिवसेनेचा शिरकाव झाला आहे. काही ठिकाणी सत्तेची जुळवाजुळव करण्यासाठी शिवसेनेने अपक्षांची मनधरणी सुरू केली आहे. एकीकडे शिवसेनेला यश मिळाले असले, तरी दुसरीकडे भाजपचे अस्तित्व मात्र नांदेड तालुक्यात कुठेही आढळून आले नाही. उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या स्थानिक नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत उत्साह दाखवला नव्हता, अशी माहिती समोर आली आहे.
नांदेड शहरालगत असलेल्या धनेगाव ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसच्या ग्रामविकास पॅनेलची सरशी झाली. १७ पकी १७ जागा जिंकून या पॅनेलने यश मिळवले. विरोधकांना येथे खातेही उघडता आले नाही. नांदेड दक्षिण मतदारसंघात येणाऱ्या धनेगावसोबतच वाजेगाव ग्रामपंचायतीतही काँग्रेसने बहुमत मिळवले. काँग्रेसला ११, तर विरोधकांना ६ जागा मिळाल्या.