सुहास सरदेशमुख

‘त्यांचं राजकारण होतं, आमचा जीव जातो’; दंगलीत होरपळलेल्या कुटुंबीयांची परवडच

लोकसभेचे प्रमुख पक्षाचे उमेदवार जाहीर झाले आणि जुन्या औरंगाबादमधील दोन घरांमध्ये पुन्हा भय दाटून आले.

दहा महिन्यांपूर्वीच्या दंगलीमध्ये हारुन कादरी यांचा मुलगा पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मारला गेला होता. तर याच रात्री शहागंजजवळील चौकात पेटवून दिलेल्या घरात अर्जुन बन्सिले यांच्या वडिलांना दंगेखोरांनी जिवंत जाळले होते. आयुष्यातला हा हादरा हिंदू- मुस्लीम या दोन्ही धर्मातील घरांना एवढा जबरदस्त होता की त्यातून दोन्ही कुटुंबे सावरलेली नाहीत. लोकसभा निवडणुकीतील प्रमुख पक्षाचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर दोन्ही कुटुंबीयांना औरंगाबादच्या राजकारणाचा पोत विचारला आणि ते म्हणाले, ‘त्यांचं राजकारण होतं, आमचा जीव जातो. इथे कोणी कोणाचा नसतो.’

औरंगाबादमधून शिवसेनेकडून चंद्रकांत खरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.एमआयएमतर्फे रविवारी रात्री आमदार इम्तियाज जलील यांना उमेदवारी मिळाली आहे.

निवडणुकांमधील प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आणि या दोन्ही घरात भय दाटले आहे. हारिसला रात्री अडीच वाजता मूत्रपिंडामध्ये गोळी लागली. त्याचा मृत्यू झाला त्या दिवशी पोलिसांनी हारुन कादरी यांच्या घराची झाडाझडती झाली. आजही त्या घटनेची प्रथम माहिती अहवालातही नोंद झाली नाही. किमान ती व्हावी म्हणून हारिसच्या वडिलांनी न्यायालयात धाव घेतली आहे. तारखापेशा सुरू आहेत.

ते सांगत होते, ‘हिंदू विरुद्ध मुस्लीम असे वातावरण निर्माण केले जाईल. कदाचित मदत देण्यासाठी काही नाटक उभे केले जाईल. पण पुन्हा एखादा हारिस मारला जाणार नाही, असे वातावरण कोण निर्माण करणार? ज्यांनी न्यायाने वागावे असे त्या पोलिसांनीच आमच्यावर अन्याय केला आहे. मला भय वाटणे स्वाभाविक आहे. त्यांचे राजकारण होते, पण मरतात मात्र

सर्वसामान्य!’

शहांगज भागात राहणारे सुरेश आणि संतोष बन्सिले यांना दंगलीचा भडका उडणार असे कळाल्याने त्यांनी पत्नी आणि मुलांना नातेवाईकांकडे नेले. आजारी वडिलांना नेण्यासाठी परत येणार होते. मात्र, तोपर्यंत दंगेखोर घरात घुसले आणि त्यांनी घरच पेटवून दिले. त्यात पायाने अपंग असणाऱ्या जगन्नाथ बन्सिले यांचा जळून मृत्यू झाला. वडील गेले तसेच दोन्ही भावाचे संसार जळून खाक झाले. सुरेश बन्सिले सांगत होते, ‘आता निवडणुका आल्या आहेत. पुन्हा काहीही घडू शकते. भय वाटू नये म्हणून आम्ही बहुसंख्य हिंदू भागात आता घर घेतले आहे. पण भय काही संपत नाही. तेव्हा जळालेला संसार उभा करण्यासाठी २० टक्के अनुदान असणाऱ्या शाळेवर वरिष्ठ लिपिक म्हणून काम करत आहे.

शाळा संपवून आल्यावर एका किराणा दुकानात काम करतो आहे. विश्व हिंदू परिषदेच्या वतीने दोन शिलाई मशीन मदत म्हणून दिल्याने पत्नी त्यावर कपडे शिवते. म्हाडाचे घर देऊ, असे आश्वासन दिले होते. पण कोणी पाळले नाही. सगळे राजकारणी सारखेच असतात. त्यांना विकासाचे काही पडलेले नसते. जातीचे राजकारण करायचे आणि आपली पोळी भाजायची.’