24 September 2020

News Flash

बहुतांशी उद्भव कोरडेठाक; पाण्याचे गणित कोलमडले

बहुतांशी नगरपालिकांच्या ठिकाणी फेब्रुवारी-मार्चनंतर पाण्याचे चित्र अधिकच धूसर होणार असल्याने टँकरची संख्या वाढविण्याचे नियोजन आतापासूनच केले जात आहे.

(संग्रहित छायाचित्र)

तीव्र दुष्काळात तहानलेल्या मराठवाडय़ास येत्या जुलैपर्यंत उपलब्ध स्रोतातून पाणीपुरवठा करण्यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली व उस्मानाबाद जिल्हय़ांतील सर्वच नगर परिषदांच्या ठिकाणी कमीतकमी फेब्रुवारीअखेर ते जास्तीतजास्त जुलैअखेपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे. पैठण शहराला दररोज, तर इतरत्र नांदेड, हिंगोलीसारख्या ठिकाणी किमान १ दिवसाआड, परंतु लातूरसारख्या ठिकाणी मात्र टँकरनेच १५ दिवसांनी एकदा पाणीपुरवठा होत आहे. ७४ पैकी निम्म्याहून अधिक ठिकाणी सध्याच पाण्याची स्थिती दोलायमान झाली आहे.
जायकवाडीच्या माथ्याला असलेल्या पैठणला जुलैपर्यंत तरी पाण्याची समस्या नाही. जायकवाडी फुगवटय़ावर अवलंबून असलेल्या गंगापूरला मात्र चार दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. अंबाडी धरणाच्या मृतसाठय़ातून कन्नडला ५ दिवसांतून एकदा पाणी दिले जात आहे. मेच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत हे पाणी पुरेल. जायकवाडी व घाणेवाडी प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या जालना शहराला सध्या ७ दिवसांतून एकदा पिण्याचे पाणी मिळते. मार्च ते जुलैपर्यंत हे पाणी पुरवता येईल. दुधना नदीपात्रातून परतूरला ४ दिवसांनी पाणीपुरवठा केला जात असून जुलैपर्यंत हे पाणी पुरेल.
परभणी जिल्हय़ातील पूर्णा शहराला सिद्धेश्वर धरणातून ४ दिवसांनी एकदा पाणी दिले जाते. सोनपेठला मुद्गल बंधाऱ्यातून ८ दिवसांनी, पाथरीला रामपुरी खुर्द येथील गोदावरी नदीपात्रालगत ढालेगाव बंधाऱ्यातून १२ दिवसांनी पाणीपुरवठा सुरू आहे. मानवतला मात्र १५ दिवसांनी एकदाच पाणी मिळत असून, जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून एक आवर्तन सुटल्यास मेअखेर येथे पाणीपुरवठा होऊ शकतो. हिंगोलीस सिद्धेश्वर धरणातून ३ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. कळमनुरीला ईसापूर धरणातून एक दिवसाआड पाणी दिले जात आहे. नांदेडातील हदगाव शहराला पेनगंगा नदीतून एक दिवसाआड फेब्रुवारीअखेर पाणीपुरवठा होईल, त्यानंतर येथे ईसापूर धरणातून पाण्याचे नियोजन केले आहे. उमरीला कुडाळ प्रकल्पातून एक दिवसाआड, लोहा शहराला सुनेगाव तलावातून ४ दिवसांनी, मुखेडला कुंडाळा तलावातून ५ दिवसांनी, धर्माबादला गोदावरी नदीतून ३ दिवसांनी आणि माहूरला पैनगंगेवरील कोल्हापूर बंधाऱ्यातून मेपर्यंत पुरेल असे पाणी देण्याचे नियोजन केले आहे.
बीड जिल्हय़ातही नगरपालिकांच्या ठिकाणी पाण्याचे चित्र बिकट झाले आहे. बीड शहराला माजलगाव धरणातून ७ दिवसांनी, अंबाजोगाई शहराला मांजरा प्रकल्पातून १५ दिवसांनी पाणी दिले जात आहे. मांजरा प्रकल्प सध्या पूर्ण कोरडाठाक झाला आहे. परळी वैजनाथला नागापूर वाण धरणातून २ दिवसांनी, माजलगावला माजलगाव धरणातून ८ दिवसांनी, गेवराईस शहागड बंधाऱ्यातून ५ दिवसांनी, धारूर व केजला १५ दिवसांनी, वडवणीला खालापूर तलावातून व आष्टीला कणसेवाडी तलावातून प्रत्येकी ४ दिवसांनी पाणी दिले जात आहे.
वर्षभर पाणीटंचाई पाचवीलाच पुजलेल्या लातूरकरांना तर दुष्काळातही पाण्याची मारामार होणे याचे अप्रूप वाटेनासे झाले आहे. एक लाख ११ हजारांहून अधिक लोकसंख्येच्या उदगीर शहराला सध्या ४० दिवसांनी एकदा पाणी दिले जात असल्याची नोंद असली, तरी प्रत्यक्षात येथे १५ दिवसांनी एकदा टँकरनेच पाणी दिले जात आहे. अहमदपूर व औशाचीही हीच स्थिती आहे. अहमदपूरला लिंबोटी, तर औशाला तावरजा मध्यम प्रकल्पातून पंधरवडय़ातून एकदाच पाणी दिले आहे.
उस्मानाबादकरांना पंतसागर धरणातून ६-७ दिवसांनी, नळदुर्गला कुरनूर प्रकल्पातून ४ दिवसांनी, उमरग्यास निम्न तेरणा प्रकल्पातून ५ दिवसांनी, मुरुमला बेनितुरा मध्यम प्रकल्पातून ७ दिवसांनी, कळंबला मांजरा प्रकल्पातून १० दिवसांनी, तर भूम शहराला आरसोली प्रकल्पातून २ दिवसांतून पाणीपुरवठा केला जात आहे. यातील बहुतांशी नगरपालिकांच्या ठिकाणी फेब्रुवारी-मार्चनंतर पाण्याचे चित्र अधिकच धूसर होणार असल्याने टँकरची संख्या वाढविण्याचे नियोजन आतापासूनच केले जात आहे. काही ठिकाणी नवीन विंधन विहिरी घेण्यावरही भर देण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2016 3:25 am

Web Title: emergence water tankers
Next Stories
1 मांजरा धरण कोरडेठाक ; लातूरकरांची आता टँकरवरच मदार
2 ‘नांदेड बंद’चा फज्जा
3 पाणीप्रश्नी संतप्त महिलांनी पालिकेला कुलूप ठोकले
Just Now!
X