News Flash

हिंदुत्वाच्या रिंगणात पुन्हा ‘संभाजीनगर’!

मुख्यमंत्र्यांच्या विधानामुळे नामांतर चर्चेला जोर

भाजपच्या हिंदुत्त्वाच्या रिंगणात तुमच्या पेक्षा आम्ही अधिक आक्रमक आहोत हे सांगण्यासाठी भाजप आणि शिवसेनेत विविध प्रतिके हाताळली गेली. हिंदुस्थानचा नकाशा पाकिस्तान आणि बांगलादेशासह दाखवून ‘अखंड’ भारताचा नकाशा असो किंवा धनुष्यधारी श्रीराम असो भाजपचे कार्यकर्ते ‘जय श्रीराम’ म्हणतात आणि शिवसेनेचे कार्यकर्ते ‘जय महाराष्ट्र’ म्हणत राहतात. प्रत्येकाच्या हातात भगव्या माळा, भाळी भगवा गंध लावणारे कार्यकर्ते दोन्ही पक्षात. अधिक आक्रमक कोण हा सुप्त वाद औरंगाबादसारख्या शहरात गेली अनेक वर्षे कायम आहे. त्या आक्रमकपणातूनच हिंदुत्वाच्या रिंगणातील संभाजीनगरचा मुद्दा अधिक पेटवला जातो. सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मुद्याबरोबर संभाजीनगरचा मुद्दा मुख्यमंत्र्यांनी उचलून धरल्याने हिंदुत्त्वाच्या रिंगणात ‘संभाजीनगर’ पुन्हा चर्चेत आले आहे.

गावात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याच्या अंगावर भगवी शाल घालून त्याचे स्वागत करण्याची प्रथा आहे की काय असे वाटावे एवढय़ा कटाक्षाने शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे काम करत. आजही गळ्यात गमछा, येणाऱ्या पाहुण्याला भगवी शाल आणि त्याच रंगाचा फेटा घातला नाही तर अनेक शिवसैनिकांना चुकचुकल्यासारखे होते. आंदोलनात तर भगवा रंग महत्त्वाचा. घोषणा देतानाही आपला आवाज अधिक मोठा असावा अशी काळजी घेणारेही भाजप-सेनेमध्ये आहेत. शिवसेनेचे बंडू ओक यांनी घोषणा देईपर्यत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही आवर्जून थांबतात. दंगल घडलीच तर आम्हीच संरक्षण करू असा संदेश देत औरंगाबादमध्ये शिवसेना वाढली. तुलनेने भाजपचे हिंदुत्व हे भाळी अष्टगंध मिरविणारे. औरंगाबादचा उल्लेख सेना-भाजपतील कार्यकर्ते आवर्जून संभाजीनगर असाच करतात. पण आम्ही आक्रमक हे ठसविण्यासाठी वापरले जाणाऱ्या बाबी अजूनही कायम आहेत, असा संदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा विधीमंडळात जोरकसपणे दिल्याने ‘औरंगाबाद’ला समर्थन देणाऱ्या कॉंग्रेसची कोंडी होण्याची शक्यता आहे. आघाडी शासनात राहून विरोध करायचा कसा आणि किती याचे कॉंग्रेसमध्ये कोणी मार्गदर्शन करत नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर किती विरोध करायचा हे अद्याप कॉंग्रेस नेत्यांचेही ठरलेले नाही. त्यामुळे शिवसेना – भाजपने आखलेल्या रिंगणात कॉंग्रेसला ‘संभाजीनगर’मध्ये स्थान नाही. पण हा मुद्दा महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने तापला तर एमआयएममधील नाराज गट महापालिका निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसच्या हाती लागू शकतो काय,याची चाचपणी केली जात आहे. संभाजीनगर नावाच्या रिंगणातून राष्ट्रवादीनेही पद्धतशीरपणे अंग चोरले आहे. आम्ही लोकांच्या बाजूचे आहोत अशी वक्तव्ये राष्ट्रवादीकडून केली जातात.

नामांतर घडवूच असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात सांगितले असले तरी  नामांतराच्या बाबतीत प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांना केंद्राची मदत घ्यावीच लागणार आहे. असे नाव बदलल्यास त्याचे परिणाम आणि नव्या नावाची जाहिरात विदेशातही करावी लागणार आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने बॉम्बेचे मुंबई सहजपणे घडले पण वेरुळ, अजिंठा लेणीबाबत अधिक माहिती करुन घेणाऱ्या परदेशातील व्यक्तीला नव्याने नवातील बदलाची नोंद घ्यावी लागणार आहे. तसेच रेल्वे, विमानतळ यासह सर्व विभागात एकच एक नाव वापरले जावे यासाठी केंद्र सरकारलाही यावर निर्णय घ्यावा लागेल त्या वेळी ‘संभाजीनगर’ या नावात आक्रमक कोण याचे नवे राजकारण होण्याची शक्यता आहे असे सांगितले जाते. त्यामुळे हिंदुत्त्वाच्या रिंगणात संभाजीनगरचा आवाज अधिक घुमण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2021 12:13 am

Web Title: emphasis on renaming discussion due to cm sambhajinagar statement abn 97
Next Stories
1 आता औरंगाबादमध्येही कास पठार; आठ टेकडय़ा फुलांनी बहरणार
2 विद्युत वाहनांच्या खरेदीचा कल वाढला, पण..!
3 शिवसेनेच्या माजी आमदाराने केली विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्यांनाच मारहाण
Just Now!
X