औरंगाबाद शहरातील चारशे एकरपेक्षा जास्त जमीन ही निजामाच्या मालकीची आहे. मात्र अनेकांनी वक्फ बोर्डाशी हातमिळवणी करून अवैध मार्गाने त्यावर ताबा मिळवल्याचा दावा सातव्या निजामाच्या वारसाकडून करण्यात आला आहे. वारसांच्यावतीने दिलशाद जा यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला.

सातवे निजाम मीर उस्मान अली खान यांना हैदराबाद संस्थान भारतात विलीन करताना त्यांच्या संपत्तीचे रक्षण करण्यात येईल असे आश्वसन देण्यात आले होते. मात्र आमची कोणतीही परवानगी न घेता वक्फ बोर्डाने परस्पर जमीन हस्तांतरित केल्याचा आरोप दिलशाद जा यांनी केला. आम्ही आमच्या मालकीची जमीन सरकारकडे मागत आहोत. सरकारने न्याय दिला नाही, तर कोर्टात जाण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील मौलाना आझाद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, रोजा बाग येथील ताज वेवंता हॉटेल, हिमायत बाग, डॉ.रफिक झकेरिया महिला कॉलेज नवखंडा, जुबलीपार्क या आणि इतर ठिकाणी निजामाच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा केल्याचा आरोप त्यांनी केला. सरकार न्याय देईल ही अपेक्षा आहे. मात्र न्याय मिळाला नाही, तर कोर्टाचे दार ठोठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.