औरंगाबादमधील अभियांत्रिकी परीक्षाप्रकरणी सात जणांच्या बदल्या, संस्थेला नोटीस

‘साई इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरींग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी’ या महाविद्यालयातील २४ विद्यार्थी आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या उपद्व्यापामुळे परीक्षेच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे परीक्षा विभागाचे संचालक दिगंबर नेटके यांचा पदभार काढण्यात आला आहे. तसेच या संस्थेला ‘आपल्या महाविद्यालयाचे संलग्नीकरण रद्द का करण्यात येऊ नये’ अशा आशयाची नोटीस बजावण्यासाठी कायदेशीर सल्ला घेतला जात आहे, असे कुलगुरू प्रो. बी. ए. चोपडे यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीमध्ये सांगितले.

दरम्यान, या घटनेची दखल घेऊन शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी कुलगुरूंना एक पत्र लिहिले असून त्यात परीक्षा घेताना कोणती काळजी घ्यावी, याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, घडलेल्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी डॉ. एम. डी. शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष चौकशी समिती नेमण्यात आल्याचे कुलगुरू चोपडे यांनी सांगितले. तसेच परीक्षा विभागातील सात जणांच्या बदल्याही करण्यात आल्या आहेत. नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने किती दिवसात अहवाल सादर करावा, यावर कोणतेही बंधन न घालता, त्यांनी तो लवकरात लवकर द्यावा, असे सुचविण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे, त्यांचीही चौकशी विद्यापीठातील अधिकाऱ्यांची चौकशी समिती करणार आहे. या समितीमध्ये डॉ. शिरसाठ यांच्या समवेत एम. पी. विधी महाविद्यालयाचे प्राचार्य पी. एन. राव किंवा ते उपलब्ध नसतील तर प्रा. साधना पांडे, प्रो. प्रवीण वक्ते यांचा समावेश आहे. दरम्यान, परीक्षा झाल्यानंतर तातडीने उत्तरपत्रिका कशा आणता येतील, याचे नियोजनही कुलगुरू चोपडे यांनी आज ‘पद्धतशीर’पणे सांगितले. उस्मानाबाद जिल्हय़ातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परीक्षेतील उत्तरपत्रिका उपकेंद्रामध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अन्य ठिकाणच्या उत्तरपत्रिका त्याच दिवशी विद्यापीठ प्रशासनापर्यंत पोहोचतील, अशी व्यवस्था करू, असेही ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. परीक्षा झाल्यानंतर सरासरी दोन दिवस उत्तरपत्रिका महाविद्यालयामध्येच ठेवल्या जात होत्या. या प्रकारामुळे उत्तरपत्रिका हाताळणे सहज शक्य असल्याचे साई इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरींगच्या प्रकरणातून पुढे आले होते. केवळ गाडय़ा नसल्यामुळे उत्तरपत्रिका एका दिवसात एकत्रित करणे शक्य होत नसल्याची तक्रार होती. परीक्षा मंडळातील अधिकाऱ्यांनी उत्तरपत्रिका गोळा करण्यासाठी अधिक गाडय़ांची गरज असल्याची मागणी कधी नोंदवलीच नसल्याचे कुलगुरू चोपडे म्हणाले.

या प्रकाराला परीक्षा विभागच जबाबदार असल्याचे सांगत नेटके यांचा पदभार आता डॉ. राजेश रगडे यांना देण्यात आला आहे. तसेच या विभागातील अधीक्षक डॉ. पी. एस. पडूळ, एन. एम. तुपे, डी. एन. बकले, ए. जी. मानपुरे, एस. बी. चव्हाण, पी. बी. निकाळजे या सात कर्मचाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्याची ही प्रक्रिया सहा महिन्यांपूर्वीच करायची होती. पण, या ना त्या कारणाने ती होऊ शकली नाही, असेही कुलगुरू चोपडे यांनी मान्य केले. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालू नये, अशी सूचना आमदार अतुल सावे यांनी चोपडे यांची भेट घेऊन केली. पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांना या अनुषंगाने विचारले असता ते म्हणाले, की ‘विद्यापीठाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांवर सुरू आहे. कुलगुरूंनी स्वत: नेमलेल्या अधिकाऱ्यांनी कसे काम केले हे तपासणे गरजेचे होते. त्यांनीच स्वत:च स्व मूल्यमापन करावे म्हणजे त्यांना स्वत:चा कारभार कळेल.’

एका बाजूला पोलिसांची कारवाई सुरू असतानाच विद्यापीठ प्रशासनाने तीन दिवसांनी या प्रकरणात एक समिती नेमली आहे. केलेल्या कारवाईची माहिती देताना आज काही विद्यार्थी संघटनांनी कुलगुरू हटावची मागणी करत विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीमध्य ेघोषणाबाजीही केली.