अभियांत्रिकी परीक्षेचे पेपर फुटण्याचा प्रकार अनेकदा समोर आला आहे. मात्र, औरंगाबादमध्ये झालेले पेपर पुन्हा लिहिणाऱ्या  रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. औरंगाबाद गुन्हे अन्वेषण विभागाने बुधवारी या रॅकेटवर कारवाई केली. शिवसेना नगरसेवकांच्या घरामध्ये हा प्रकार सुरु होता.  ३० जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये नगरसेवकांच्या मुलासह तीन मुलींचाही समावेश आहे. संबंधितांवर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हे सर्व विद्यार्थी औरंगाबाद शहरातील चौका परिसरात असलेल्या साई अभियांत्रिकी महाविद्यालयातील आहेत. अभियांत्रिकी परीक्षा देताना या विद्यार्थ्यांनी उत्तर पुन्हा लिहिता यावी, यासाठी रिकामी जागा सोडली होती. शिवसेना नगरसेवक सीताराम सुरे यांच्या घरात हे सर्व विद्यार्थी पेपर लिहिताना सापडले. यात नगरसेवकांच्या मुलाचाही समावेश आहे. या प्रकाराविषयी कोणतीही कल्पना नव्हती, असे सुरे यांनी म्हटले आहे. तपासात जे विदयार्थी  किंवा प्राध्यापक दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करू, अशी प्रतिक्रिया संस्थेचे अध्यक्ष अॅड. गंगाधर मुंडे यांनी दिली.