बालवारकऱ्याला मंदिरातील वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरून फेकून दिल्याप्रकरणी औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी शनिवारी येथील कीर्तनकारास ताब्यात घेतले. बालवारकऱ्यांना कीर्तनकलेचे शिक्षण देणाऱ्या संत ज्ञानेश्वरमहाराज मंदिरातच हा प्रकार घडल्यामुळे मोठीच खळबळ उडाली. पोलिसांकडून या कीर्तनकाराची रविवारी कसून चौकशी करण्यात आली.
सागर भारत डमाळे (वय १५, धोंडलगाव, हल्ली आपोगाव, तालुका पैठण) असे या घटनेतील मुलाचे, तर भानुदास ज्ञानेश्वरमहाराज कोल्हापूरकर (वय ३०, आपेगाव) असे कीर्तनकाराचे नाव आहे. आपेगाव येथे गेल्या २ नोव्हेंबरला पहाटे पाचच्या सुमारास सागर यास फेकून दिल्याचा प्रकार घडल्याचे त्याच्या वडिलांनी शनिवारी पैठण पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सहायक अधीक्षक बच्चन सिंह यांनी लक्ष घातल्यानंतर कारवाईची सूत्रे हलली.
भानुदास याला वारकरी दिंडीदरम्यान एका भाविक महिलेसह नको त्या अवस्थेत सागरने बघितले होते. तेव्हापासून भानुदास अस्वस्थ होता. सागरमुळे समाजात आपली बदनामी होऊ शकते, या भीतीपोटी सागरला मंदिराच्या वसतिगृहाच्या इमारतीवरून त्याने फेकून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दि. २ नोव्हेंबरला पहाटे हा प्रकार घडल्यानंतर सागरला जखमी अवस्थेत त्याच दिवशी औरंगाबाद एमजीएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. शनिवारी सागरला बरोबर घेऊनच त्याच्या वडिलांनी पैठण पोलिसांत रितसर फिर्याद दिली. दरम्यान, वरिष्ठ पातळीवरून हे प्रकरण दडपण्याचा रविवारी दिवसभर प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली.
आपेगावच्या ज्ञानेश्वरमहाराज मंदिराच्या वसतिगृहात सागर डमाळे हा मुलगा इतर मुलांसह कीर्तनकलेचे शिक्षण घेत आहे. आषाढी वारीमध्ये ज्ञानेश्वर पालखी रवाना झाली. भानुदास ज्ञानेश्वरमहाराज कोल्हापूरकर यांच्या नेतृत्वाखाली या पालखीने प्रस्थान ठेवले. पंढरपूर ते पैठण दरम्यान पालखीच्या प्रवासात भानुदासला महिलेसोबत नको त्या अवस्थेत सागरने बघितले होते. बदनामीच्या भीतीने हा प्रकार केल्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भानुदासला ताब्यात घेतले. वसतिगृहावरून खाली पडल्याने सागरचा डावा पाय व डावा हात फ्रॅक्चर झाला, तसेच तोंड फुटले. त्याच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, महाराजाला वाचविण्यासाठी बडय़ा धेंडांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
‘तपास सुरू आहे’
रविवारी सकाळीही औरंगाबाद ग्रामीणचे सहायक पोलीस अधीक्षक व पैठण विभागाचे उपअधीक्षक बच्चन सिंह यांनी या मंदिरास भेट देऊन माहिती घेतली. या वेळी काही आक्षेपार्ह मिळाले किंवा काय, या बाबत ‘तपास सुरू आहे’ अशी प्रतिक्रिया देऊन अधिक काही बोलण्यास त्यांनी नकार दिला.
मागच्या पानावरून पुढे!
पैठण येथेच पाच वर्षांपूर्वी घडलेल्या प्रकारात तुळशीराममहाराज काकडे याला त्याच्या सुनेचा निर्घृण खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाली होती. मुंबई उच्च न्यायायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या खालच्या न्यायालयाने सुनावलेली शिक्षा कायम केली होती. या बरोबरच दोन वर्षांपूर्वी रखमाजीमहाराज नवले यांच्या वारकरी शिक्षण संस्थेत दोन वर्षांपूर्वी बालवारकऱ्याने महाराजांच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणीही पैठण पोलिसांत नोंद आहे.