12 July 2020

News Flash

मांजरा धरण कोरडेठाक ; लातूरकरांची आता टँकरवरच मदार

लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धनेगाव धरणातील पाणीसाठा सोमवारी पूर्ण आटला.

लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धनेगाव धरणातील पाणीसाठा सोमवारी पूर्ण आटला. शहराच्या विविध भागातील पाण्याच्या टाकीमध्ये दोन दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. परिणामी शहरवासीयांना आता धनेगाव धरणाशिवायच्या पाणीसाठय़ावर व तेही टँकरने आणण्यावर अवलंबून राहावे लागणार आहे.
गेली ३ वष्रे मांजरा धरणातील पाणीसाठा अचल होता. या साठय़ातील पाण्यावर इतके दिवस लातूरकरांची तहान भागवता आली. सोमवारी पाणीपुरवठय़ाच्या बारा पाणबुडय़ा पाणी संपल्यामुळे आचके देऊ लागल्या. त्यामुळे मोटारी बंद कराव्या लागल्या. १५ दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांनी शहराला नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची योजना आखली होती. दररोज ५५ दशलक्ष लिटर पाणी उपशावरून तो ८ दशलक्ष इथपर्यंत कमी केला असल्यामुळे १५ दिवसांतून एकदा नळाने पाणी पुरवता येईल, असे सांगितले. मात्र, आठच दिवसांत पाण्याने अंदाज चुकवल्यामुळे नळाद्वारे पाणीपुरवठा करता येणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले व आठ दिवसांत धनेगाव धरणातील पाणीसाठा पूर्णपणे संपला असल्याचे सांगण्यात आले.
सोमवारी रात्रभर महापालिकेचे अभियंता यंत्रसामग्रीसह काम करीत होते. मंगळवारी दुपापर्यंत पाणीसाठा खोदून वाढवता येईल काय, या बाबत प्रयत्न करण्यात आला. मात्र, या प्रयत्नातून आणखी ३ दिवस पाणी मिळेल इतकाच साठा हाती लागला. रेणापूर तालुक्यातील भंडारवाडी धरणावरून दररोज ४० टँकरच्या प्रत्येकी तीन खेपा याप्रमाणे १२० टँकर पाणी उचलण्याची योजना पालिकेने कागदावर आखली आहे. हे पाणी आर्वी बुस्टरपंपात टाकून शुद्ध करून शहरातील विविध टाक्यांत पाठवले जाईल व तेथून टँकरने पाणी पुरवले जाणार आहे. भंडारवाडी ते नवीन रेणापूरनाका मार्गावर टँकरची होणारी गर्दी, त्यामुळे वाहतुकीला होणारा अडथळा, टँकर भरण्यास लागणारा कालावधी याचे गणित जमले नाही तर चार दिवसांत डोंगरगाव बंधाऱ्यातून पाणी टँकरने उचलण्याचा पर्याय राबवण्यात येणार आहे. माकणी धरणातून पाणी घेण्यासाठी बेलकुंडपर्यंत पाणी आणावे लागेल, त्यासाठी किमान महिनाभराचा कालावधी लागू शकतो. त्यानंतर तेथून टँकरने पाणी आणण्याचा पर्याय वापरला जाणार आहे. धनेगाव धरणातील पाणीसाठा संपला व संपूर्ण शहराला विविध ठिकाणचे पाणी टँकरने आणून पुरवले जाणार आहे.
ज्या विंधनविहिरींना पुरेसे पाणी आहे अशा २८ खासगी विंधनविहिरी अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. गेल्या १५ दिवसांपासून साई बंधाऱ्यात चर खोदण्याचे काम सुरू आहे. मात्र, कामाची गती व पाणीही कमी आहे. चार विंधनविहिरी घेण्यात आल्या असून दोन विंधनविहिरींना पाणी लागले आहे. सरकारने चर खोदण्यास मंजुरी दिली असून त्यापूर्वीच पालिकेने निविदा मागवल्या आहेत. उद्या (बुधवारी) या निविदा उघडल्या जाणार असून त्यानंतर काम सुरू होईल. धनेगाव धरणात गाळ वाळल्यानंतर चर खोदण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.
भूजल विभागातर्फे पाणी लागण्याचा जो अंदाज व्यक्त करण्यात आला, त्या प्रमाणात पाणी उपलब्ध होत नसल्याचे सध्या तरी दिसत आहे. उन्हाळाभर टँकरने प्रत्येक कुटुंबासाठी ५ दिवसांतून एकदा २०० लिटर पाणी दिले जाणार आहे. पाण्याच्या उपलब्धतेनुसार या वेळापत्रकात थोडासा बदल करावा लागणार आहे. पालिकेची ही अपरिहार्यता नागरिकांनी लक्षात घेण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
सरकारचा थंडा प्रतिसाद
गेल्या सहा महिन्यांपासून लातूरचा पाणीप्रश्न ऐरणीवर आहे. रेल्वेने पाणी देण्यापासून मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्या. मात्र, प्रश्नाची तड काही लावली जात नाही. माकणी धरणातून बेलकुंडपासून लातूर शहरास जलवाहिनीतून पाणी देण्याबाबत २७ कोटींचा प्रस्ताव प्रलंबित आहे. यावर निर्णय घेऊन अंमलबजावणी झाली तर जूनमध्ये पाऊस पडण्यास उशीर झाला तरी पाणी मिळू शकते. भंडारवाडीवरून जलवाहिनीचा प्रस्तावही प्रलंबित आहे. याशिवाय डोंगरगावहून जलवाहिनीतून पाणी आणता येऊ शकते. लातूरच्या पाणी प्रश्नाकडे मंत्रालय अनास्था दाखवत असल्यामुळे तक्रार कोणाकडे करायची? हा प्रश्न आहे.
तुटपुंजा कर्मचारीवर्ग
लातूर महापालिकेकडे पूर्वीच्या नगरपालिकेइतकाही कर्मचारीवर्ग नाही. दररोज नवे प्रश्न आ वासून उभे राहत आहेत. या प्रश्नाला उत्तर कसे द्यायचे? हे आहे त्या कर्मचाऱ्यांना सुचत नाही. टंचाई काळात तरी सरकारने खास बाब म्हणून अभियंते व कर्मचारीवर्ग वाढवून देण्याची गरज आहे. मात्र, या बाबतही ठोस निर्णय घेतला जात नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2016 3:24 am

Web Title: entirely depends dam tankers
टॅग Dam
Next Stories
1 ‘नांदेड बंद’चा फज्जा
2 पाणीप्रश्नी संतप्त महिलांनी पालिकेला कुलूप ठोकले
3 बाकोरिया मनपाचे नवे आयुक्त
Just Now!
X