‘लोकसत्ता’ आयोजित चर्चासत्रात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे संकेत

औरंगाबाद : महाराष्ट्रातून आपला उद्योग गुजरातमध्ये हलविणाऱ्या उद्योजकांनी तेथील असुविधांमुळे आता कानाला खडा लावला आहे. राज्यातील उद्योग अन्य राज्यात स्थलांतरीत करणाऱ्यांची अशीच अवस्था असल्यामुळे पुढील काळात महाराष्ट्रातच मोठी गुंतवणूक होईल,असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

गुजरातमध्ये गेलेले उद्योजक पुन्हा महाराष्ट्राच्या वाटेवर असल्याचे संकेत त्यांनी दिले.  औरंगाबाद येथे एनकेजीएसबी बँक प्रस्तुत व एमआयडीसीच्या सहाय्याने ‘लोकसत्ता’च्यावतीने उद्योजकांसाठी विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात   ‘मसिआ’ संघटनेचे विशेष सहकार्य लाभले. त्यात उद्योगमंत्री  बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबलगन, एनकेजीएसबी बँकेचे उपाध्यक्ष सुनील गायतोंडे, मुंबई शेअर बाजाराचे मुख्य नियामक अधिकारी नीरज कुलश्रेष्ठ उपस्थित होते.

महाराष्ट्रातच माहिती तंत्रज्ञानाचे कुशल मनुष्यबळ तयार झाले. औषधांचे उद्योगक्षेत्रही महाराष्ट्रात बहरले. पण नंतर अनेकजणांनी त्याचा विस्तार वेगवेगळ्या राज्यात केला. त्यासाठी वेगवेगळ्या राज्य सरकारांनी उद्योजकांना खूप सुविधा देऊ असे सांगितले होते. पण गुजरातमधल्या दहेजमध्ये औषधनिर्माण क्षेत्रात उद्योग विस्तार करणाऱ्यांना आता राष्ट्रीय हरित लवादाच्या चकरा माराव्या लागत आहेत. कारण, अगदी सामूहिक सांडपाणी व्यवस्थादेखील तेथील औद्योगिक वसाहतींमध्ये उपलब्ध नाही. महाराष्ट्रात कुशल मनुष्यबळ आहे. ब्राह्मोस क्षेपणास्त्रातील विविध सुटे भाग महाराष्ट्रात बनले आहेत. राज्यात उभी केलेली उद्योगातील यंत्रणा अधिक चांगली असल्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रातच मोठी गुंतवणूक होईल. एकही उद्योग महाराष्ट्राच्याबाहेर दिला जाऊ देणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनीही जाहीर केले आहे. लघु उद्योगाच्या क्षेत्रात सर्व तऱ्हेच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. मुंबई शेअर बाजार व अन्य क्षेत्रांतून भांडवल कसे उभे राहू शकते, याच्या कार्यशाळा घेतल्या जात आहेत. लघुउद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वच पातळीवर प्राधान्य दिले जाईल, असेही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबलगन म्हणाले की, वाळूज व औरंगाबाद क्षेत्रातील औद्योगिक क्षेत्रातील प्रश्न निश्चितपणे सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. मुख्यमंत्री रोजगार योजनेत १७ हजार अर्ज आले होते. या वर्षांत १० हजार अर्ज मंजूर करायचे आहेत. मराठवाडय़ातील बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद येथेही विस्तार वाढवायचा आहे. विश्वासाचे धोरण आखले जात आहेत. उद्योग क्षेत्रातील नियम व कायद्यांबाबत जीएसटी, एक्साइज आणि उद्योग विभागातील अधिकाऱ्यांकडून एकाच वेळी  तपासण्या होतील, याचीही काळजी घेत आहोत. यावेळी एनकेजीएसबी बँकेच्या सुनील गायतोंडे यांनी लघुउद्योजकांना भांडवल उभे करण्यासाठी मदत करण्यास बँक प्रोत्साहन देईल, असे सांगितले, तर नीरज कुलश्रेष्ठ यांनी शेअर बाजाराच्या अनुषंगाने गुंतवणुकीच्या लाभाबाबत मार्गदर्शन केले.

कुशल मनुष्यबळ आणि उद्योगातील यंत्रणा अधिक चांगली असल्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रातच मोठी गुंतवणूक होईल. मुंबई शेअर बाजार व अन्य क्षेत्रांतून भांडवल कसे उभे राहू शकते, याच्या कार्यशाळा घेतल्या जात आहेत. लघुउद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे.  –  सुभाष देसाई, उद्योगमंत्री