राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये शिक्षकेतर पदाच्या सेवाप्रवेश नियमावलीत असलेली भिन्नता आता असणार नाही. या संदर्भात उच्च शिक्षण विभागातर्फे प्रवेश नियमावली सुधारणा समिती स्थापन करण्यात आली असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील उपकुलसचिव दिलीप भरड व कक्ष अधिकारी भगवान फड यांची समिती सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.
राज्याचे शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी विद्यापीठाला पाठवलेल्या परिपत्रकात ही माहिती दिली आहे. राज्यातील अकृषी विद्यापीठांमध्ये असलेल्या शिक्षकेतर पदाच्या सेवाप्रवेश नियम (वर्ग १ ते ४ भरती प्रक्रिया) सुधारणा करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव शिवशरण माळी समितीचे अध्यक्ष, तर प्रशासन अधिकारी प्रकाश बच्छाव सदस्य सचिव आहेत. या समितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील आस्थापना विभागाचे उपकुलसचिव दिलीप भरड व भगवान फड यांची नियुक्ती केली.
आतापर्यंत विद्यापीठनिहाय वर्ग १ ते ४ पदाच्या भरती प्रक्रियेत शैक्षणिक अर्हता, भरती प्रक्रिया, वेतनश्रेणी, पदनाम, नियुक्तीची कार्यपद्धती, अनुभव, एकाकी पदे यामध्ये भिन्नता होती. या संदर्भात डॉ. माने यांच्या अध्यक्षतेखाली उच्च शिक्षण विभागाने नेमलेल्या समितीची ४ मे २०१३ रोजी बैठक होऊन नवीन नियमावली करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. एका महिन्यात ही समिती अहवाल देणार आहे.