05 March 2021

News Flash

Coronavirus : दररोज २०० च्या सरासरीने करोनाबाधितांत वाढ

औरंगाबाद शहरात खाटांचा ताळमेळ नाही, कोविड उपचार केंद्र वाढविण्याची पालिकेकडून तयारी

औरंगाबाद शहरात खाटांचा ताळमेळ नाही, कोविड उपचार केंद्र वाढविण्याची पालिकेकडून तयारी

औरंगाबाद : शहरातील करोना विषाणूचा प्रसार पाच हजाराच्या घरात पोहचला असून रविवारी सकाळी २०८ रुग्णसंख्या वाढली. आतापर्यंत दोन हजार ४४६ जण बरे झाले असून आतापर्यंत २३८ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रविवारची रुग्णसंख्या ९३ एवढी आहे. पुन्हा एकदा बजाजनगर भागातील रुग्ण कमालीचे वाढले आहेत. सध्या दोन हजार २९० जणांवर उपचार सुरू आहेत. महापालिका हद्दीमध्ये नव्याने ११५ रुग्ण वाढले आहेत. विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्याने रुग्णालयातील स्वच्छतेचे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. मेट्रॉनच्या कोविड उपचार केंद्रात आज सफाई न झाल्याने काही रुग्णांनी स्वत:च सफाई करून घेतल्याचे वृत्त आहे. दरम्यान, रुग्णसंख्या आणि खाटांचाताळमेळही नव्याने घालण्याची आवश्यकता आहे.

कोविड उपचार केंद्रामध्ये तसेच जिल्हा रुग्णालयातील खाटांची संख्या आणि रुग्णांची लक्षणे यानुसार त्याचे वर्गीकरण करण्याची गरज आहे. तसेच खासगी रुग्णालयात सौम्य लक्षणे असणाऱ्यांनी खाटा अडवून ठेवल्यामुळे खाटांच्या व्यवस्थापनाचे प्रश्न निर्माण होऊ शकतात, असे आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती सांगत आहेत. दरम्यान ज्यांना सौम्य किंवा लक्षणे नाहीत, अशांना पुन्हा कोविड उपचार केंद्रात हलविता येईल, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात येत आहे. खासगी रुग्णालयात गंभीर रुग्णांऐवजी सौम्य लक्षणे असणाऱ्यांना भरती करून न घेता त्यांना महापालिकेच्या उपचार केंद्रात हलविण्याच्या सूचना या पूर्वी महापालिकेच्या आरोग्य प्रशासनाने दिल्या होत्या. दरम्यान, शहरातील विविध भागात रुग्णसंख्या वाढत आहे. शहराभोवतलच्या गावात रुग्ण आढळून येत असल्याने त्याचा परिणाम शहरातील काही खासगी रुग्णालयावर होऊ शकतो. जिल्हा रुग्णालयातून सौम्य लक्षणे असणारे रुग्ण कोविड उपचार केंद्राकडे पाठविण्यात येत आहेत. मात्र, खासगी रुग्णालयातून कोविड उपचार केंद्रात पाठविण्याचे प्रमाण कमी असल्याचे महापालिका आरोग्य अधिकारी नीता पाडाळकर यांनीही मान्य केले.

दरम्यान, करोना कहर वाढल्यास कोविड उपचार केंद्र वाढविण्यात येणार आहेत. राजर्षी शाहू महाविद्यालयात ६६ खाटांचे उपचार केंद्र सुरू करणार असल्याचेही पाडाळकर यांनी सांगितले.

‘घाटी’ची पाहणी आणि तपासणी

शहरातील खासगी रुग्णालयातील खाटांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी नेमणूक केली आहे. तसेच खाटांची स्थिती सांगणारी माहिती आता ऑनलाइनही उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच घाटी रुग्णालयात औषध उपलब्ध असतानाही प्रसूतीसाठी आलेल्या रुग्णाच्या नातेवाइकांना बाहेरून औषधे आणवयास सांगण्यात आल्याचे विभागप्रमुखांनीही मान्य केले. अशी कृती करणाऱ्या कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यास नोटिस बजावण्याचेही आदेश देण्यात आले. खासदार इम्तियाज जलील, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी  यांनी घाटी रुग्णालयातील बहुउपचचार रुग्णालयास भेट दिली. येथे आता ७२ रुग्ण स्थलांतरित करण्यात आले आहेत. मात्र, मनुष्यबळ नसल्याने सारे काही अडलेले आहे. औषधे उपलब्ध असतानाही घाटी रुग्णालयातील काही जण बाहेरून औषध आणण्यास सांगतात. अशा प्रकारे काम करणाऱ्यांची एक साखळी कार्यरत असल्याचा आरोप खासदार जलील यांनी केला होता. त्याची प्राथमिक तपासणी आज विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व खासदार जलील यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली.

लातूरमध्ये एका दिवशी २९ करोनाबाधित 

जिल्ह्यात शनिवारी एकाच दिवशी तब्बल २९ करोनाबाधित आढळले आहेत. लातूर शहरात १०,औसा ९ अहमदपूर ७, तर उदगीर येथील तिघांचा यात समावेश आहे. जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या ३९० वर पोहोचली असून आतापर्यंत उपचार घेऊ न घरी गेलेले १९६ रुग्ण असून सोळा जण मरण पावले आहेत. सध्या ९४ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. शनिवारी नव्याने जे २९ रुग्ण करोनाबाधित आढळले ते शहरातील नव्या भागातील आहेत. सुळ गल्ली, शिवनगर, साईनगर, झिंगण अप्पा गल्ली, ऑइल नगर, अंबाजोगाई रोड अशा वेगवेगळ्या भागातील हे रुग्ण आहेत. या आधी या भागांत रुग्ण आढळलेले नाहीत.

औरंगाबादमध्ये आठ जणांचा मृत्यू

रविवारी आठ करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. सिटी चौक, सादतनगर, रामकृष्णनगर, आंबेडकरनगर, सिल्लेखाना हे शहरातील  खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव, वैजापूर शहरातील एक महिला तसेच याच तालुक्यातील शिऊर येथील रुग्णांचा मृतांमध्ये समावेश आहे. या सर्वाचे वय ६० ते ७५ या दरम्यानचे आहे. घाटी रुग्णालयात आतापर्यंत १९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, १२४ रुग्णांची स्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.

नांदेडमध्ये १८ बाधित

नांदेडमधील काँग्रेसचा एक आमदार करोनाबाधित झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील ९ जणांसह अन्य ७ जणांना करोनाची बाधा झाल्याचा अहवाल शनिवारी मध्यरात्री प्रशासनाला प्राप्?त झाला होता. त्यापाठोपाठ आता रविवारी त्यामध्ये दोघांची भर पडल्याने ही संख्या १८ पोहोचल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ३६७ वर पोहोचली असून १६ जणांचा मृत्यू झाला आहे. नव्याने बाधित झालेले १८ जण शहरातील गवळीपुरा, चैतन्यनगर, पीरबुर्?हाणनगर, आंबेडकर, विष्णुपुरी येथील तसेच ग्रामीण भागातील लोहा, बळेगाव ता. देगलूर येथील असल्याचे सांगण्यात आले. या सकारात्मक प्राप्?त झालेल्या अहवालात एका ४ वर्षांच्या बालकाचाही समावेश आहे. या १८ करोनाबाधितांचे वय ४ ते ५७ वयोगटातील असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

जालन्यात नवीन ४२ रुग्ण

जालन्यात शनिवारी नवीन ४२ रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्य़ातील करोनाबाधितांची संख्या ५०४ झाली. नव्याने आढळलेल्यांमध्ये ४० करोनाबाधित जालना शहरातील असून दोन ग्रामीण भागातील आहेत. जालना शहरातील करोनाबाधितांची संख्या २९५ झालेली असून जिल्ह्य़ातील एकूण रुग्णांमध्ये हे प्रमाण जवळपास ५९ टक्के आहे. जाफराबाद तालुक्याच्या ठिकाणी आतापर्यंत २५ तर अंबड शहरात १९ रुग्ण आढळून आलेले आहेत. आतापर्यंत आढळून आलेल्या ५०४ करोनाबाधितांपैकी ३७८ जून महिन्यातील आहेत. १३ रुग्णांचे मृत्यू आतापर्यंत झालेले असून यापैकी १२ मृत्यू हे जून महिन्यातील आहेत.

कुटुंबीयांसह आमदार उपचारासाठी औरंगाबादला

शनिवारी काँग्रेसच्या एका आमदारास करोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे स्वॅबचे अहवाल प्रशासनाने घेतले होते. त्यातील ९ सदस्य बाधित झाले. त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते; परंतु आमदारांच्या कुटुंबातील काही सदस्यांना उपचारासाठी औरंगाबादला हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2020 3:38 am

Web Title: everyday average 200 coronavirus cases in aurangabad zws 70
टॅग : Coronavirus
Next Stories
1 बोगस सोयाबीन बियाणे उत्पादक, विक्रेत्यांविरोधात गुन्हे दाखल करा
2 निराधार मुलांना सांभाळणाऱ्यांपुढे नवे संकट
3 औरंगाबादेत करोना रुग्णांची संख्या वाढतीच
Just Now!
X