आरोग्य विभागातील आणि गावातील आरोग्याशी निगडित ग्रामविकास विभागातील कर्मचाऱ्यांच्या भरतीची परीक्षा २८ फेब्रुवारीला घेतली जाणार आहे. राज्यात आरोग्य विभागाची १७ हजार पदे रिक्त असून त्यातील ५० टक्के पदे म्हणजे साडेआठ हजार पदांच्या बढतीस मुभा देण्यात आल्यानंतर पदभरतीच्या परीक्षा याच महिन्यात पूर्ण होतील आणि मार्च महिन्याच्या पहिल्या-दुसऱ्या आठवडय़ात पदस्थापनेचे आदेश दिले जातील, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी औरंगाबाद येथे सांगितले.

जिल्हा वार्षिक आढाव्याच्या बैठकीसाठी ते औरंगाबाद येथे आले होते.

आरोग्य विभागातील ही परीक्षा ओएमआर पद्धतीने घेतली जाणार असून त्याच्या प्रश्नपत्रिका काढण्याचे काम माहिती व तंत्रज्ञान विभागाने नेमलेल्या कंपनीकडून केले जात आहे. आरोग्यसेवक आणि सेविका या पदांचाही यात समावेश आहे. साधारणत: पाच हजार पदांची भरती पहिल्या टप्प्यात केली जाणार असल्याचेही टोपे यांनी सांगितले. पोलीस, ग्रामविकास मंत्रालय तसेच आरोग्य विभागातील पदांची भरती होणार आहे.

लस नोंदणीबाबतच्या तक्रारी चुकीच्या- टोपे

कोविन अ‍ॅपमध्ये लसीचा दुसरा डोस देताना अनागोंदी असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. मात्र, खात्री केल्यानंतर तसे त्यात तथ्य नाही. कारण पहिला डोस आणि दुसरा डोस नोंदविताना काही नोंदणी ‘ऑफलाईन’करण्यात आली होती. ती आता पुन्हा ऑनलाईन केली जाईल. त्या तक्रारींमध्ये फारसे तथ्य नाही. त्याच बरोबर लस देण्याचा दुसरा टप्पा आजपासून सुरू करण्यात आला असून केंद्र सरकारकडून ३० कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण करण्याचा संकल्प आहे. त्यात सहआजार असणाऱ्या व्यक्तींच्या समावेश कधी होईल, याची उत्सुकता आम्हालाही आहे. मात्र, जोपर्यंत ३० कोटी लसीकरण पूर्ण होणार नाही तोपर्यंत नव्या व्यक्तींना लसीकरणाची मुभा दिली जाणार नाही. गरीब, दारिद्रयरेषेखालील व्यक्तींना मोफत लस मिळावी, अशीच आमची मागणी आहे, असेही राजेश टोपे एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.