औरंगाबाद : मराठवाडय़ात दोन दिवसांपासून सर्वदूर पाऊस असून गुरुवारी बहुतांश भागात सूर्यदर्शन झालेले नाही. औरंगाबाद, नांदेड या जिल्ह्य़ातील मिळून १६ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून अनेक भागातील शेतांमध्ये पाणी साचल्याने पिकांबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. प्रकल्पांमधील साठय़ात झपाटय़ाने वाढ होण्यासारखा सध्याचा पाऊस मात्र सुरू नाही.

औरंगाबादमधील वैजापूर तालुक्यातील वैजापूर, बोरसर, लोणी, कन्नडमधील कन्नड, चापनेर, चिकलठाणा, पिशोर, चिंचोली, करंजखेड, खुलताबादमधील सुलतानपूर, सिल्लोडमधील आमठाणा, बोरगाव या बारा मंडळात तर नांदेडमधील भोकरच्या मोघली, किनवट, बोधाडी व माहूरच्या वानोला, या मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. कन्नडच्या करंजखेड मंडळात १०५ मिमी पाऊस झाला. तर किनवटच्या बोधाडी येथे ९५ मिमी पाऊस झाला.

ऑगस्टमध्ये सुरुवातीला जवळपास तीन आठवडे पावसाने विश्रांती घेतली होती. शेतक ऱ्यांनी पावसाची प्रतीक्षा करून शेतीत माना टाकत असलेल्या पिकांना पाणी दिले. त्यानंतर एक-दोन दिवसांत पावसाचे पुनरागमन झाले असून दोन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिमीने शेतांमध्ये पाणी साचू लागले आहे. औरंगाबाद विभागात जून-जुलैची सरासरी ३२० मिमी असून पाऊस ४६५ मिमी झालेला आहे. तर ऑगस्ट महिन्याची सरासरी ११८.५ मिमी असून आतापर्यंत ६४.४ मिमी पाऊस झाला आहे.

लातूरमध्ये पावसाची रिपरिप

लातूर : लातूर जिल्ह्य़ात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असून या पावसाने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे. १५ ऑगस्टपासून पाऊस सुरू झाला असून बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. रात्री जिल्ह्य़ातील सर्व तालुक्यांत व तालुक्यातील सर्व मंडळात पावसाने हजेरी लावली. १९ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्य़ात सरासरी ११.२ मि.मी. इतका पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्य़ाची एकूण पावसाची सरासरी ४९१.७ मि.मी. इतकी झाली असून जिल्ह्य़ात अपेक्षित पावसाच्या ११०.१ टक्के तर वार्षिक सरासरीच्या ६९.६ टक्के पाऊस झाला आहे. गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते.

बीडमधील पिके तरली; पाणीसाठय़ाचा प्रश्न

बीड : जिल्ह्य़ात दीर्घ प्रतीक्षेनंतर पाऊस सक्रिय झाल्याने खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. माना टाकलेली पिके तरली असली तरी प्रकल्पीय पाणीसाठय़ाचा प्रश्?न मात्र कायम आहे. पाणीटंचाईचे संकट टळण्यासाठी अजूनही मोठय़ा पावसाची प्रतीक्षा आहे. दोन दिवसांपासून रिमझिम सुरू असल्याने गुरुवारी सकाळपासूनच जनजीवनावर परिणाम होऊ लागल्याचे दिसून आले. वार्षिक सरासरीच्या तुलनेत सत्तर टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील १४४ लघु, मध्यम प्रकल्पात २५ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. सध्या सुरू असलेल्या मुर पावसामुळे खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन ही पिके तरली असून कापसालाही जीवनदान मिळाले आहे. नदी, नाले अजूनही खळखळून वाहिली नाहीत. माजलगाव धरणात तीस टक्के तर बिंदुसरा प्रकल्पात ३८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.