* नदीपात्रात ३५ हजार क्युसेक वेगाने पाणी * मराठवाडय़ातील काही धरणे अजूनही कोरडीच

औरंगाबाद : गोदावरीच्या पाणलोटात पडणाऱ्या पावसाचा जोर वाढल्यामुळे गुरुवारी सकाळी जायकवाडीचे १६ दरवाजे दोन फूट उचलून ३५ हजार क्युसेक वेगाने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. या पाणी प्रवाहामुळे पात्रात बांधण्यात आलेल्या उच्चपातळी बंधारे भरून घेता येतील. परिणामी गोदातीरीतील विहिरींमध्ये पाणी पाझर वाढेल आणि काही गावांमधील दुष्काळी स्थितीवर मात होणार आहे. जायकवाडीतून एक लाख क्युसेक वेगाने पाणी सोडले तरी भोवतालच्या शेतीचे तसे फारसे नुकसान होत नाही. पात्रात सोडलेल्या पाण्यामुळे पिण्याच्या पाण्यासह अनेक गावांतील सिंचनाचे प्रश्न मार्गी लागणार आहेत.

जायकवाडी धरणात सध्या तीन हजार ६८२ क्युसेक वेगाने पाणी येत आहे. हा वेग वाढत राहिला तर पात्रात पाणी सोडण्याचा वेगही ४० हजार क्युसेकपर्यंत वाढविला जाऊ शकतो. सध्या जायकवाडीहून माजलगाव धरणालाही पाणी सोडण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांतील पावसामुळे जायकवाडीसह अन्य काही धरणातील पाणीसाठाही काही अंशाने वाढला आहे. विष्णपुरी धरण पूर्णत: भरले असून येलदरी धरणाचा पाणीसाठा चार टक्क्य़ांवर आला आहे. मात्र, अजूनही सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा, निम्नतेरणा, सीनाकोळेगाव ही धरणे शून्यापेक्षा कमी पातळीवरच आहे. उणे चिन्हात धरणातील पाणीसाठा असल्याने टंचाईचे सावट अद्याप दूर झालेले नाही. बुधवारी औरंगाबाद जिल्ह्य़ातील वैजापूर तालुक्यातील लोणी येथे ८६ मि.मी. पाऊस नोंदवला गेला. औरंगाबाद जिल्ह्य़ात पडलेला पाऊस वार्षिक सरासरीच्या ८३.४२ टक्के एवढा आहे. मात्र, खुलताबाद तालुक्यात ते प्रमाण केवळ ५३.९० टक्के एवढे आहे. जिल्ह्य़ात सर्वाधिक पाऊस वैजापूर तालुक्यात नोंदविण्यात आला. सिल्लोड, सोयगाव या तालुक्यात पडलेला पाऊस वार्षिक सरासरीची टक्केवारी ओलांडणारा झाला आहे. जालना जिल्ह्य़ातील भोकरदन तालुक्यातही अशीच स्थिती आहे. मात्र, भोकरदन वगळता अन्य तालुक्यात तुलनेने कमी पाऊस आहे. त्यात जालना तालुक्यात वार्षिक सरासरीच्या ५७.७० टक्के पाऊस नोंदविण्यात आला आहे. परभणी तालुका, सेलू आणि जिंतूर या तालुक्यात तुलनेने कमी पाऊस आहे. हिंगोलीतील वसमत तालुक्यात कमी पाऊस झाला आहे. बीड जिल्ह्य़ातील केज, धारूर, शिरूर कासार तालुक्यात अजूनही ५० टक्क्य़ांपेक्षा कमी पाऊस आहे. उस्मानाबाद जिल्ह्य़ातील भूम, कळंब आणि परंडा या तालुक्यातील पावसाचे प्रमाण ५० टक्क्य़ांपेक्षाही कमी आहे.

तरुण वाहून गेला

बुधवारी झालेल्या पावसात लोहारा तालुक्यात पडलेल्या पावसामुळे नदीला पाणी आले होते. लोहारावरून गावी मोहाबुद्रूककडे दुचाकीवरून जात असताना सुभाष भोंडवे नावाचा तरुण वाहून गेला असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षातून मिळाली. एका पुलाजवळ दुचाकी आणि चपला सापडल्यामुळे वाहून गेलेल्या व्यक्तीचा शोध अग्निशमन दलाच्या मदतीने केला जात आहे.