News Flash

मोबाइलच्या अतिवापरामुळे मुले सैरभैर

वाळूजमधील जोगेश्वरीत सानिया या १५ वर्षांच्या मुलीने घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना अलीकडेच घडली

(संग्रहित छायाचित्र)

घरातून पळून जाण्यासह आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय

बिपीन देशपांडे, लोकसत्ता

औरंगाबाद : औरंगाबादच्या मोहिनी या १३ वर्षांच्या मुलीने काही दिवसांपूर्वी गळफास लावून जीवन संपवले. मोहिनीला दहा रुपये खर्चासाठी हवे होते. तिची आई भांडी घासून तर वडील मिस्त्री काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या वर्गातील. हवी ती मागणी, वस्तू, मोबाइल फोन किंवा त्यावर खेळ खेळण्यासह तत्सम मागणी पूर्ण होत नसल्याच्या हट्टातून मुले राग अनावर होऊन घर सोडून जाण्यासह जीवनाविषयीही टोकाचा निर्णय घेत आहेत. मोहिनी एक समोर आलेले उदाहरण. तर क्षुल्लक कारणावरून घर सोडून जाणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. अशी मुले पालकांसह समाज, पोलिसांचीही चिंता आणि काम वाढवत आहेत.

नागेश्वरवाडीतील एक तेरा वर्षांची मुलगी आई-वडिलांविषयी झालेल्या गैरसमजातून नुकतीच घर सोडून भोपाळला निघालेली होती. पालकांनी क्रांती चौक पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. उपनिरीक्षक अनिता बागुल यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचून त्या मुलीला ताब्यात घेतले. तिच्याशी केलेल्या चौकशीतून संबंधित मुलगी काहीशी स्वैर वागू लागली आणि त्यातून ती भोपाळला पळून जाण्यासाठी घरातून बाहेर पडली, असे उपनिरीक्षक अनिता बागुल यांनी सांगितले.

रेल्वे सुरक्षा बलाचे (आरसीएफ) पोलीस निरीक्षक अरविंद शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर २०२० ते मे २०२१ पर्यंत ९ मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. पालकांवर नाराज होऊन या मुलांनी घर सोडले होते. तर औरंगाबाद रेल्वे पोलिसांनी जानेवारी ते २२ जूनपर्यंतच्या कालावधीत पाच मुले व २ मुली, अशा एकूण ७ बालकांना घर सोडून पळून जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ताब्यात घेतले. त्यातील एका मुलाला व मुलीला बालसुधारगृहात पाठवले. आणखी एका मुलाला व मुलीला उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिले. तर ३ मुलांना त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात दिल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक बालकृष्ण किरवले यांनी दिली. रेल्वे सेनेलाही तीन लहान मुले घरातून पळून जाताना निदर्शनास आल्यानंतर स्थानिक पालिसांच्या मदतीने त्यांना त्यांच्या पालकांकडे सोपवण्यात आल्याचे सेनेचे सोमाणी यांनी सांगितले. वाळूजमधील जोगेश्वरीत सानिया या १५ वर्षांच्या मुलीने घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना अलीकडेच घडली. क्षुल्लक कारणावरून मुले टोकाचे निर्णय घेत असल्याची अनेक उदाहरणे समोर येत असून पालकवर्ग चिंतेत पडला आहे.

वयात येणाऱ्या मुलींशी आई-वडिलांनी संवाद साधायला हवा. त्यांच्यासाठी वेळ काढायला हवा. मुलांना समाजमाध्यमांपासून दूर ठेवले पाहिजे. मोबाइल फोनवर मुले अभ्यासाव्यतिरिक्त अधिक वेळ घालवत असून मायाजालावरील अनेक संकेतस्थळाच्या मोहात अडकून भरकटत आहेत.

अनिता बागुल, उपनिरीक्षक.

मुलांची मनोसामाजिक अवस्था बिघडलेली आहे. म्हणजे सतत स्क्रिनिंग, अभ्यास-जो एकतर्फी आहे. पालकांकडून मिळणाऱ्या सततच्या सूचना, याचा वैताग मुलांमध्ये दिसून येतो. मुलांची कोणासोबत तुलना नको, मूल्यमापन नको. त्यांच्या चुकांवर बोलू नये. वैतागून मुले काहीतरी शोधण्याच्या नादात मोबाइल फोनवर भरकटत जातात. त्यामुळे मोबाइल फोन देण्याच्या वेळेचा नियम ठरवावा. त्याचे पालन पालकांनी करावे. स्वतच्या मूडनुसार मोबाइल, अभ्यासावरून मुलांना बोलण्याचा स्वभाव बाजूला ठेवावा. एक तास तरी मुलांसोबत संवाद साधण्यासाठी वेळ काढावा.

डॉ. संदीप शिसोदे, मानसतज्ज्ञ.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 25, 2021 12:13 am

Web Title: excessive use of mobile phones is a big threat to children zws 70
Next Stories
1 एमआयएम दिल्ली, उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये उतरणार
2 नामशेष होणाऱ्या देशी वृक्षांसाठी बियाणांची बँक आणि रोपवाटिका
3 मराठवाड्याच्या शहरी भागात राष्ट्रवादीची वाढ खुंटलेलीच
Just Now!
X