औरंगाबादमध्ये मोठय़ा प्रमाणात चाचण्यांचा प्रयोग करत करोना विषाणूचा पाठलाग करण्याचा प्रयोग हाती घेण्यात आल्यानंतर लातूर आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यात एक ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान पुन्हा टाळेबंदी केली जात आहे. विषाणूला शोधून लक्षणे नसतानाच उपचार केले तर संसर्ग कमी होऊ शकतो असा प्रशासनाचा दावा आहे. मात्र, टाळेबंदी हा उपाय वापरला जात असल्यामुळे नाराजी पसरत आहे. टाळेबंदीच्या प्रयोगामुळे उद्योगामध्ये मात्र अनिश्चिततेचे वातावरण आहे. दरम्यान औरंगाबाद शहरात शुक्रवारी २३३ रुग्ण नव्याने वाढल्याचे अहवालानंतर स्पष्ट  झाले आहे.

औरंगाबाद शहरात  फुले नगर व आंबेडकरनगर भागात अ‍ॅन्टिजेन चाचण्यास विरोध सुरू आहे. कोणतीही लक्षणे नसताना का चाचण्या करता असा सवाल विचारला जात आहे. दरम्यान लोकांना समजावून सांगण्यासाठी वरिष्ठ अधिकारीही समुपदेशनासाठी बाहेर पडले आहेत. दरम्यान सरसकट चाचण्या केल्याने करोना रुग्ण सापडतात असे नाही, असे लक्षात आल्यानंतर चाचण्यांच्या वेगाला चाळणीही लावली जात आहे. अ‍ॅन्टिजेन आणि आर-टी पीसीआर चाचण्या नक्की कोणाच्या करायच्या याचे प्रयोग केले जात आहेत. विषाणू संसर्ग झालेल्या भागातील व्यक्ती आणि प्रसार करू शकतील अशाच व्यक्ती म्हणजे भाजी, फळविक्रेत्यांच्या चाचण्या केल्या जाणार आहेत. दरम्यान औरंगाबाद शहरात शुक्रवारी करण्यात आलेल्या अ‍ॅन्टिजेन चाचण्या आणि गुरुवारी करण्यात आलेल्या आरटी-पीसीआर चाचण्यांच्या अहवालानुसार २३३ रुग्ण आढळून आले. दरम्यान शुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आणखी चार जणांचा मृत्यू झाला असून त्यातील एक जण गेवराई येथील रहिवासी आहे. वैजापूर, पैठण व खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी येथील व्यक्तीचा मृत्यू झाला. घाटी रुग्णालयातील मृत व्यक्तींचा आकडा आता ३५९ एवढा झाला आहे. तर खासगी रुग्णालयातील करोनामुळे व्यक्तींसह जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण ४५९ एवढे झाले आहे.

दरम्यान विविध ठिकाणी होणाऱ्या टाळेबंदीला प्रकाश आंबेडकर यांनी कडाडून विरोध केला. केवळ पाच टक्केच लोकांना करोना होत आहे. त्यामुळे ९५ टक्के व्यक्तींनी आपले व्यवहार पूर्वीप्रमाणे करावेत, असे ते म्हणाले. बकरी ईद, राखी पौर्णिमा पारंपरिक पद्धतीने करावी, असेही त्यांनी म्हटले.