स्थानिक बाजारपेठेत प्रतिकिलो शंभर रुपये असलेल्या खजूरचा भाव रमजानच्या मुहूर्तावर चांगलाच वधारला आहे. त्यामुळे देशासह परदेशातील खजूरही मोठय़ा प्रमाणात उस्मानाबादच्या बाजारपेठेत दाखल झाला आहे. इराणी शाखा नावाने प्रसिद्ध असलेले खजूर यंदा थेट ८५० रुपयांच्या घरात पोहोचले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा या विदेशी पेंड खजूरमध्ये १० टक्के वाढ झाली असली, तरी रमजान महिन्यात मुस्लीम बांधवांकडून याची मोठय़ा प्रमाणात खरेदी होते.
मुस्लीम समाजबांधवांचा रमजान महिना सोमवारी सुरू झाला. रमजानच्या रोजासाठी (उपवास) उस्मानाबादच्या बाजारपेठेत देश-विदेशातील पेंड खजूर, तसेच विविध प्रकारची फळे दाखल झाली आहेत. पवित्र रमजान हा मुस्लीमधर्मीयांचा सर्वात मोठा सण आहे. या कालावधीत उपवासादरम्यान लागणाऱ्या विविध खाद्यपदार्थाची बाजारात मोठी मागणी असते. शहरातील ख्वाजानगर, नेहरू चौक या परिसरात दररोज सायंकाळी खाद्यपदार्थाचा मोठा बाजार सुरू होतो. रोजाचा उपवास सोडताना फळांबरोबर खजूरलाही मोठे स्थान मिळते. त्यामुळे १०० रुपयांपासून थेट ८५० रुपये किलोपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वेगवेगळ्या आकारातील खजूरपेंड सध्या बाजारात पाहावयास मिळत आहेत. यात इराकी शाखा नावाचा खजूर सर्वाधिक भाव खाऊन आहे. प्रतिकिलो ८०० रुपये या दराने इराकी शाखा या खजूरपेंडची सध्या विक्री होत आहे. या पाठोपाठ केनिया इराणी नावाचे खजूर ३०० रुपये किलो, तर सलाम इराणी नावाचे खजूर २४० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहे. सौदी अरेबिया ब्रँडखाली विकले जाणारे खजूर २०० रुपये, तर इराणी नावाचे खजूरपेंड १४० रुपये किलो या दराने सध्या बाजारात उपलब्ध आहे. भारतातील इंदूर या नावाने प्रसिद्ध असलेले खजूरपेंडही मोठय़ा प्रमाणात बाजारात उपलब्ध आहे. परदेशातील अन्य खजूरच्या तुलनेत याचा दर अत्यंत कमी असल्यामुळे इंदूर खजूरला ग्राहक सर्वाधिक पसंती देत आहेत. प्रतिकिलो ९५ रुपये दराने इंदूर खजूर बाजारात विकले जात आहे. स्थानिक बाजारपेठेत फळांच्या आणि अन्य खाद्यपदार्थाच्या मागणीला अचानक आलेला चढाव अनेक किमती वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. बाजारात उपलब्ध असलेले इराकी शाखा खजूर व त्याची मागणी पाहता, यंदा रमजानमध्ये परदेशातील खजूर चांगलेच भाव खाऊन जात आहे.