दहा हजार घेताना पकडले

औरंगाबाद : भाजपा युवा मोर्चाचा नेता आहे म्हणून एका कंपनीच्या खानावळीच्या कंत्राटामध्ये भागीदारी मागून त्या संदर्भातील तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी १० हजारांची लाच घेणारा प्रशांत देवीदास पंडित याला रविवारी रात्री रंगेहात पकडल्याची माहिती सिडकोच्या पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली. या प्रकरणी लेखराजसिंह निहालसिंह यांनी सिडको पोलिसांकडे अर्ज केला होता.

गुलमंडी भागातील दिवाण देवडीचा रहिवासी असलेला प्रशांत पंडित हा चहा विक्रीचा व्यवसाय करतो. त्याने आपण भाजपा युवा मोर्चाचा नेता असल्याचे सांगत इंडो जर्मन टूल्स रूम कंपनीची खानावळ चालवणारे लेखराजसिंह निहालसिंह यांना व्यवसायात ५० टक्के भागीदारी देण्याची मागणी केली होती. भागीदारी मिळत नसल्यामुळे पंडित याने लेखराजसिंह यांची कंपनीकडे तक्रार केली. हा तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी पंडित प्रत्येक महिन्याला ५० हजार रुपये देण्याची मागणी करत होता. नंतर त्याने २५ हजारांची मागणी केली. याची माहिती लेखराजसिंह निहालसिंह यांनी पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी, उपनिरीक्षक भारत पाचोळे यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनावरून प्रशांत पंडित याला दहा हजार देण्याचे ठरवून सापळा रचला.

दहा हजारांची रक्कम रविवारी सिडकोतील एन-५ मधील अन्नपूर्णा हॉटेलसमोरील भागात स्वीकारताना प्रशांत पंडित याला रंगेहात पकडले. प्रशांत पंडित विद्यार्थी आघाडीचा शहर जिल्हा उपाध्यक्ष असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.