सुहास सरदेशमुख

करोनाकाळामुळे अडचणीमध्ये आलेली मद्यविक्रीची स्थिती काहीशी सुधारत आहे. मात्र, दूधविक्रीचे ग्रहण सुटताना दिसत नाही. पाच लाख लिटर दूध राज्यात अतिरिक्त ठरत असून दूध भुकटी केल्यास प्रश्न सुटू शकतो. मात्र, गेल्या महिन्याभरापासून दूध उत्पादकांच्या प्रतिलिटर २५ रुपयांनी खरेदी केलेल्या दुधाची रक्कम मिळत नसल्याने जिल्हा दूध संघांच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. दरम्यान, विदेशी मद्याच्या विक्रीत जून महिन्यात चार टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. बीअर आणि वाइन विक्रीत मात्र मोठी घट दिसून येत आहे.

अगदी दुष्काळाच्या तीव्र स्थितीमध्येही मराठवाडय़ासह राज्यातील विविध भागांत मद्यविक्रीत कधी घट दिसत नव्हती. टाळेबंदीमध्ये ऑनलाइन शहरात आणि नेहमीप्रमाणे ग्रामीण भागात मद्यविक्री सुरू झाली असली तरी एकूण विक्रीमध्ये जून महिन्यात सहा टक्क्यांची घट दिसून येत असून विदेशी मद्यविक्रीत चार टक्के वाढ दिसून आली आहे. या महिन्यातील राज्य उत्पादन शुल्कही आता २२२ कोटी १८ लाख २९ हजार रुपये मिळाले आहे. एका बाजूला मद्यविक्रीचा प्रश्न काही प्रमाणात मिटला असला तरी राज्यातील दूध मात्र अतिरिक्त ठरू लागले आहे. औरंगाबाद जिल्हा दूध संघातून ८६ हजार लिटर दूध संकलन होत. करोनामुळे झालेल्या टाळेबंदीमध्ये हॉटेल व्यवसाय, मिठाईची दुकाने बंद झाली आणि दूध वापर घटला. साधारणत: २७ ते २८ हजार लिटर दूध शहरात पाकिटातून विक्री होत आहे. तर राज्य सरकारकडून महानंदच्या माध्यमातून ३५ हजार लिटर दूध खरेदी होते. मात्र, गेल्या महिन्याभरापासून त्या खरेदीचे देयक देण्यात आलेले नाही. त्यामुळे सारे अर्थकारण बिघडले आहे. नफ्यात असणाऱ्या काही दूध संघांनी स्वरकमेतून शेतकऱ्यांना दुधाची रक्कम दिली. या अनुषंगाने अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली असून तातडीने रक्कम द्यावी, अशी मागणी करण्यात आली असल्याचे सहकारी दूध संघाच्या कामावर बारकाईने लक्ष ठेवणारे भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांनी सांगितले. दूध भुकटी करून ठेवण्याशिवाय आता दूध संघांसमोर अन्य पर्याय नाहीत. सध्या दूध भुकटीचा दर २८५ रुपये प्रतिकिलो असा आहे. त्यामुळे महानंदने अधिक दूध खरेदी करावे आणि अतिरिक्त दुधाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

मद्यविक्रीला गती

टाळेबंदीमध्ये दूधविक्री घसरली तसेच मद्यविक्रीचेही झाले होते. मात्र, ऑनलाइन विक्रीला सुरुवात झाली आणि मद्यविक्रीत वाढ दिसून येत आहेत. जून महिन्यात विदेशी मद्यविक्रीत चार टक्के वाढ झाली. गेल्या वर्षी म्हणजे २०१९-२० मध्ये चार लाख ३५ हजार ३६४ लिटर मद्यविक्री झाली होती. जून महिन्यात चार लाख ५४ हजार ७४३ लिटर मद्यविक्री झाली. विदेशी मद्यविक्रीत जरी वाढ दिसून येत असली तरी देशी मद्यविक्रीमध्ये सहा टक्के घट दिसून आली आहे. जून महिन्यात गेल्या वर्षी १२ लाख ४९ हजार ९६७ तर या वर्षांत म्हणजे २०२०-२१ च्या जून महिन्यात ११ लाख ७९ लाख ७४२ लिटर मद्यविक्री झाली. बीअर आणि वाइनमधील घट ४७ टक्के तर वाइनची विक्रीच होत नाही. परिणामी या वर्षी होणाऱ्या राज्य उत्पादन शुल्कात २२२ कोटी रुपये वाढले आहेत. हे सारे तुलनेने कमी असल्याचेच सांगण्यात येत आहे.