धरणे अजूनही शून्याच्या खालीच

औरंगाबाद : गच्च भरून येणारे आभाळ, आता पाऊस कोसळेल अशी स्थिती. पण तो भुरभुर येत राहतो. त्यामुळे पाऊस आला नाही, असेही म्हणता येत नाही. पण पडणारा पाऊस मराठवाडय़ासाठी कमालीचा कमी आहे. अजूनही मराठवाडय़ातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा झाला नाही. नाशिकमध्ये पडणाऱ्या पावसामुळे जायकवाडीमध्ये पाण्याचा प्रवाह येतो आहे एवढेच काय ते समाधान. गेल्या २४ तासांत ५३ हजार क्युसेक वेगाने पाणी जायकवाडीकडे येत होते. गेल्या २४ तासांत साधारणत: १२५ दलघमी म्हणजे ४.४१ अब्ज घनफूट पाणी जायकवाडीत दाखल झाले आहे. याच वेगाने पुढील २४ तास पाणी येत राहिले, तर जायकवाडी धरण शून्याच्या पातळीपर्यंत येईल.

हिंगोली जिल्ह्य़ात काही ठिकाणी चांगला पाऊस झाल्याचे वृत्त आहे. मात्र, अजूनही मराठवाडय़ातील १७ तालुक्यांमध्ये अपेक्षित पावसाच्या सरासरीपेक्षा ५० टक्केही पाऊस झालेला नाही. मराठवाडय़ात १०० मि.मी. पेक्षा कमी पाऊस झालेले  ३० मंडळे आहेत. या मंडळांमध्ये केलेली पेरणी किती दिवस टिकेल, हा प्रश्न कायम आहे. मात्र, ढगाळ वातावरणामुळे पीक तगले आहेत. नगर आणि नाशिक जिल्ह्य़ात पडलेल्या पावसामुळे आणि औरंगाबादसह मराठवाडय़ात गेल्या दोन दिवसांपासून भुरभुर पाऊस सुरू आहे. या भिज पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असले, तरी धरणसाठय़ामध्ये वाढ झालेली नाही. पैनगंगा आणि मनार ही दोन धरणे वगळली तर जायकवाडी, निम्नदुधना, येलदरी, सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा, निम्नतेरणा, सीनाकोळेगाव या धरणांमधील पाणीसाठा अजूनही शून्याच्या खाली उणे चिन्हात आहे. त्यामुळे टंचाई हटलेली नाही. काही गावांतील टँकर कमी झाले आहेत. सध्या १६७३ टँकरने पिण्यासाठी पाणीपुरवठा करावा लागत आहे. महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्य़ांमध्ये धो-धो पडणारा पाऊस मराठवाडय़ात मात्र रिमझिम बनतो. या पावसामुळे आशा पल्लवीत झाल्या आहेत.

५० टक्क्य़ांपेक्षा कमी असलेले तालुके

परंडा-४०.९, वाशी-४८.२, कळंब-४८.१, उस्मानाबाद-४९, चाकूर-३७.३, औसा-३४.५, लातूर-४५.२, धारूर-४०.५, केज-४७.१, अंबाजोगाई-३९.८, वडवणी-३३.२, शिरूरकासार-३७.५, गेवराई-३४.७, बीड-४९.९, देगलूर-४४.१, वसमत-३३.३, परभणी-४२.९.

१०० मि.मी.पेक्षा कमी पाऊस झालेले मंडळ

पैठण तालुक्यातील बिहामांडवा येथे ९८ मि.मी. पाऊस, अंबड तालुक्यातील धनगर पिंप्री-७६ मि.मी., वसमत तालुक्यातील टेंभुर्णी-८१ मि.मी., बीड तालुक्यातील राजुरी-४८ मि.मी., नाळवंडी-९७ मि.मी., लिंबागणेश-९७ मि.मी., गेवराई तालुक्यातील उमापूर-७५ मि.मी., चकलंबा-८७ मि.मी., मादळमोही-९९ मि.मी., पाचेगाव-७५ मि.मी., रेवकी-८९ मि.मी. आणि शिरसदेवी-७१ मि.मी., शिरुरकासार-८५ मि.मी., रायमोह-८८ मि.मी., वडवणी-७४ मि.मी., केज तालुक्यातील बनसारोळा-६१ मि.मी., धारूर तालुक्यातील मोहखेड-९० मि.मी., तेलगाव-७८ मि.मी., परळी तालुक्यातील नागापूर-७४ मि.मी., लातूर तालुक्यातील कासारखेडा-९३ मि.मी., गातेगाव-९४ मि.मी., तांदुळजा-८६, औसा तालुक्यातील लामजना-९८ मि.मी., भादा-९३ मि.मी. आणि बेळकुंड-५३ मि.मी., उस्मानाबाद जिल्ह्य़ातील पाडोळी-९५ मि.मी,  कळंब तालुक्यातील येरमाळा-९४ मि.मी., मोहा-९२ मि.मी., परंडा तालुक्यातील आसू-६५ मि.मी, सोनारी-८८ मि.मी.