सिडको औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

निश्चलनीकरणात बाद ठरवलेल्या एक हजार व पाचशे रुपयांच्या नोटा बँकेत भरण्याच्या मुदत कालावधीचा फायदा घेत एका अज्ञाताने त्याच्या जवळील तब्बल ५० हजार रुपयांच्या बनावट नोटा १० ऑक्टोबर २०१६ ते २४ नोव्हेंबर २०१६ या दरम्यान खऱ्या भासवून बँक ऑफ महाराष्ट्रच्या औरंगाबाद शहर, जिल्हा व जालना जिल्ह्यातील ६४ शाखांमध्ये जमा करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी एका अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात बँक ऑफ महाराष्ट्रच्या सिडकोतील टाऊन सेंटर शाखेतील सुदाम तुकाराम भालेराव यांनी औद्योगिक वसाहतील सिडको पोलीस ठाण्यात सोमवारी सायंकाळी तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे, की सिडको एन-१ मधील टाऊन सेंटरच्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेकडे १० ऑक्टोबर २०१६ ते २४ नोव्हेंबर २०१६ या कालावधीत निश्चलनीकरणाच्या अनुषंगाने बंद केलेल्या एक हजार व पाचशे रुपयांच्या नोटा जमा करून नागपूर येथील भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेकडे पाठवण्यात आल्या. यामधील ५० हजार रुपये किमतीच्या नोटा बनावट असल्याचे नागपूर येथील रिझव्‍‌र्ह बँकेच्या प्रबंधकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर बनावट नोटा चलनात आणण्याच्या उद्देशाने जमा करणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.