आठवडी बाजारातील खरेदी-विक्रीवर ग्रामीण भागातील उद्योगाचे अर्थकारण बरेचसे अवलंबून असते. सध्या बाजार बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील अनेक व्यवसायांना त्याचा फटका बसत असून पाऊस आणि थंडीपासून बचाव करणाऱ्या घोंगडी उद्योगातून तयार झालेला माल विक्रीअभावी पडून आहे.

मेंढरांच्या लोकरापासून तयार होणारी घोंगडी तशी आरोग्यदायीही मानली जाते. साधारण पित्त प्रकोपात घोंगडीवर झोपणे हे फायद्याचे आहे, असा दावा घोंगडी कारागिरांकडून केला जातो. शिवाय अ‍ॅक्युप्रेशर या वैद्यकीय उपचार पद्धतीप्रमाणे शरीरभर टोचणाऱ्या क्रियेप्रमाणे लोकरीच्या घोंगडीचाही उपयोग होत असल्याने तिला आरोग्याच्या अंगाने पाहिले जाते. धार्मिकतेतही घोंगडीचे महत्त्व असून दत्त जयंतीच्या दरम्यान करण्यात येणाऱ्या गुरुचरित्र पारायणातील दिवसांमध्ये साधक पांढऱ्या रंगाच्या घोंगडीचाच अंग टाकण्यासाठी उपयोग करतात. थंडीत उबदार तर पावसाळ्यात अंग भिजणार नाही, असाही घोंगडीचा उपयोग ग्रामीण भागात पूर्वापार चालत आलेला आहे, असे कारागीर सांगतात.

घोंगडी तयार करणारी औरंगाबाद, जालना जिल्ह्य़ात काही गावे आहेत. औरंगाबाद जिल्ह्य़ात कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी, बाजारसावंगी, बोरमाळ तांडा, लाडसावंगी, गोलटगाव, जालन्यातील अंबड तालुक्यातील काही गावे आहेत. चिंचोली लिंबाजी येथील संतोष विठ्ठल ढेपले म्हणाले, ‘‘घोंगडीचे महत्त्व अनेक अंगाने आहे. घोंगडीचा वापर आरोग्यदायी आहे. नव्या पिढीला घोंगडीचे महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे. आजकालच्या पांघरुणापेक्षा क्षणभर टोचल्यासारखे वाटणारी घोंगडी अधिक ऊबदार असते. पावसाळ्यातही तिचा भिजण्यापासून बचाव करण्यासाठी उपयोग होतो. सध्या वडोदबाजार येथील बाजार बंद असल्याने माल पडून आहे.’’

घोंगडी तयार करणारी काही मोजकीच घरे, कुटुंबे आता राहिली आहेत. तयार केलेली घरोघर जाऊन घोंगडी विकणारे जगन्नाथ जोशी म्हणाले, ‘‘घोंगडीचे सर्व प्रकार तयार केले जात असले तरी सध्याच्या परिस्थितीत घोंगडीला शहरात दोन-पाचशे घरे फिरल्यानंतर एखादा ग्राहक लाभतो. त्यातही मेहनतीपेक्षा कमी भावात मागणी केली जाते. कारण लोकर गोळा करण्यापासून ते प्रत्यक्ष घोंगडी निर्मितीपर्यंतचा खर्च, कारागिरांना द्यावी लागणारी मजुरी आणि त्यातून मिळणारा नफा पाहता प्रत्यक्ष निर्मिती करणाऱ्यांना परवडण्यासारखी परिस्थिती नाही. लोकरीचे गोखरं काढणे, चिंचेचे पाणी उकळून त्यात सूत बुडवून विणायला घेणे किंवा खास कारागिराकडून यंत्रमागावर विणणे, यातील खर्च पाहता हजार ते बाराशे रुपये जातात. त्यातून घोंगडी किती रुपयाला विक्री करावी, असा प्रश्नच आहे. घोंगडीमागची मेहनत, त्याचे आरोग्यदायी महत्त्व पाहून एखादाच ग्राहक तो अपेक्षित किमतीत खरेदी करतो.’’

घोंगडीचे महत्त्व अनेक अंगाने आहे. घोंगडीचा वापर आरोग्यदायी आहे. नव्या पिढीला घोंगडीचे महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे. आजकालच्या पांघरुणापेक्षा क्षणभर टोचल्यासारखे वाटणारी घोंगडी अधिक ऊबदार असते.

– संतोष ढेपले , चिंचोली लिंबाजी