शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीला वेळ लागत असला तरी योग्य शेतकऱ्याला नक्की लाभ मिळेल, असे मत अन्न व औषध पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केलं. शेतकऱ्यांनी संयम बाळगावा असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. आघाडी सरकारच्या काळात कर्जमाफीदरम्यान गोंधळ झाला. तसा प्रकार आता होणार नाही. योग्य व्यक्तिला लाभ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. औरंगाबाद येथील सुभेदारी विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सरकार विरोधात सध्या सर्वत्र नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात ते म्हणाले की, तो फक्त प्रचाराचा भाग आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी सरकारने सकारात्मक गोष्टी केल्या आहेत. थोडं संयमान घेतलं तर त्याचे परिणाम पाहायला मिळतील. कर्जमाफीच्या बाबतीतही तीच गोष्ट लागू होते. निर्णय अंमलबजावणीला वेळ लागत आहे. मात्र, योग्य शेतकऱ्याला लाभ मिळेल.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना स्वस्त धान्य दुकानामार्फत देण्यात येत असलेल्या धान्य योजनेसंदर्भात ते म्हणाले की, योजनेची गरज किती आहे याचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने योजना बंद करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. सुभेदारी विश्रामगृहावर बापट आले त्यावेळी याठिकाणी शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांचा नियोजित कार्यक्रम सुरु होता. यावेळी खैरे यांनी भगवी शाल देऊन बापट यांचं स्वागत केलं.