पालकमंत्र्यांनी भेट नाकारल्याने शेतकऱ्यांचा ठिय्या; २३ वेळा आक्षेप नोंदवून देखील अडवणूक

चार गावांच्या सीमेवरचा दोन फुटांचा एक बांध आणि समृद्धीतील दरांमध्ये तब्बल ७८ लाखांचा फरक. फातियाबाद, तळेसमान ही दोन गावे गंगापूर तालुक्यातील आणि माळीवाडा व दौलताबाद ही दोन गावे औरंगाबाद तालुक्यातील. गावांच्या सीमा चिकटून. पण दरांमधला एवढा फरक कशासाठी, असा सवाल घेऊन पालकमंत्री रामदास कदम यांची भेट घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना त्यांनी गुरुवारी वेळच दिला नाही. शेतकरी वैतागले. जिल्हाधिकारी कार्यालयातच त्यांनी बसकण मारली. शेवटी जाता जाता पालकमंत्री कसेबसे थांबले. २०-२५ सेकंदांत त्यांनी त्यांचे निवेदन स्वीकारले. जाताना म्हणाले, मुंबईत या, मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घालून देतो. तब्बल २३ वेळा आक्षेप दाखल करणाऱ्या चार गावांतील शेतकऱ्यांची पुन्हा अडचण झाली. दराचा पेच कायम आहे तो आहेच.

गंगापूर तालुक्यातील फातियाबादमध्ये बाळू हेकडे आणि त्यांचे काका रमेश हेकडे यांची साडेचार एकर शेती आहे. त्यांना ‘तुमची शेती समृद्धी महामार्गात घेतली जाणार आहे,’ असे कळविण्यात आले आणि दर सांगितला गेला १२ लाख ७० हजार रुपये. शेजारच्या दौलताबाद गावातील गटात हाच दर ८० लाखांच्या घरात दिला गेला. त्या गावात अनेकांनी समृद्धी महामार्गासाठी जमीन विक्री केली. माळीवाडा आणि दौलताबाद या दोन्ही गावांतील शेतकऱ्यांना एवढा अधिक भाव आणि आम्हाला कमी भाव का, असा प्रश्न विचारत जगन्नाथ भगत, बाळू हेकडे, राजू जारवाल, मारुती फटांगडे यांच्यासह १५० शेतकरी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आले. कोणी तरी त्यांना सांगितले, आज पालकमंत्री औरंगाबादेत येणार आहे. शेतकरी जेव्हा दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात आले, तेव्हा पर्यावरणमंत्री रामदास कदम प्लास्टिक बंदीवरची बैठक घेत होते. शेतकरी अचानक आले आणि पालकमंत्री चिडले. ‘तुम्ही आत आलात कसे’ असे म्हणत त्यांनी शेतकऱ्यांना सभागृहाबाहेर जाण्यास सांगितले. काही मिनिटांचा वेळ मिळाला तर पुन्हा एकदा समृद्धीचा पेच त्यांना सांगावा, अशी शेतकऱ्यांची इच्छा होती. पण पालकमंत्र्यांनी वेळ नाकारला. या अनुषंगाने बोलताना बाळू हेकडे म्हणाले, ‘उद्धव ठाकरेंपासून ते पालकमंत्र्यांपर्यंत सगळ्यांना वेळ मागितली. २३ वेळा आक्षेप दाखल केले. ते आक्षेप एकतर्फी निकालात काढण्यात आले. शेवटी आमच्या जमिनीवर आम्ही बोर्ड लिहिले आहे, ‘ही जमीन विकणे नाही’. गावात प्रशासकीय अधिकाऱ्यांना यायला बंदी घातली आहे. पण प्रशासनावर काहीएक फरक पडला नाही. आता ही बाब आम्ही सांगायची तरी कुणाला?’  फातियाबाद, तळेसमान, दौलताबाद, माळीवाडा या चार गावांच्या शीव ज्या भागात आहे, तेथून समृद्धीचा मार्ग जातो. माळीवाडा आणि दौलताबादला अधिकचा दर, तर गंगापूर तालुक्यात कमी. फरक तब्बल ७८ लाखांचा. आम्ही जमीन द्यावी तर कशासाठी, असा प्रश्न जगन्नाथ भगत यांनी उपस्थित केला. पण शेतकऱ्यांचे हे प्रश्न ऐकण्यासाठी ना प्रशासनाला वेळ होता, ना मंत्र्यांना. या गावातील बाजारभाव जरी तपासले तरीसुद्धा दर जास्त होतात. पण सरासरी दर काढताना सर्वात कमी आणि सर्वात जास्त अशी तुलना करून दर ठरविले असल्यामुळे या शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार सरसकट सगळ्यांना दर द्यावेत, अशी मागणी शेतकरी करीत आहे.

समृद्धीसाठी जमीन विकत घेताना निर्माण होणारे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालू, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर मंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाडय़ातील काही गावांना भेटी दिल्या होत्या. त्याच वेळी त्यांनी समृद्धीला जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कारही केला होता. या पाश्र्वभूमीवर किमान शिवसेनेतील नेते तरी आपले म्हणणे ऐकून घेतील, अशी शेतकऱ्यांना आशा होती, ती आज फोल ठरली. दोन फुटांचा एक बांध आणि दरातील ७८ लाखांचा फरक कोणीतरी सोडवावा, असे निवेदन २० सेकंदामध्ये स्वीकारत पालकमंत्री कदम यांनी वेळ नाकारल्यामुळे शेतकरी हैराण झाले.

  • ज्या भागात फळबागा अधिक आहेत अशा ठिकाणी अधिक दर द्यायला हवे होते. मात्र, तसे न करता गट क्रमांक बदललेला नसतानाही दरांमध्ये कमालीची तफावत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.
  • माळीवाडा, कच्चीघाटी, पळशी या भागांतील शेतकऱ्यांबरोबरच फातियाबाद व तळेसमान येथील शेतकरीही हैराण झाले आहेत. वारंवार निवेदने देऊनही प्रशासन आणि सरकारवर काहीएक परिणाम होत नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.