मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध पक्षांचे नेते, चित्रपट अभिनेत्यांनी दुष्काळी दौरे करीत शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत आत्महत्या करू नये, असे आवाहन केल्यानंतरही शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. सोमवारी जाळून घेतलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.
जिल्ह्यात सलग ३ वर्षांपासून पावसाच्या हुलकावणीमुळे टंचाईचा सामना करावा लागत आहे. यंदा तर पाऊस गायब झाल्यामुळे भीषण दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. प्रत्येक दिवस शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त घेऊनच उजाडू लागला आहे. वर्षभरात शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यामुळे राज्य-देशपातळीवरून विविध उपाययोजना करण्याचे सूतोवाच होत असले, तरी आत्महत्येचे सत्र मात्र थांबताना दिसत नाही.
मागील आठवडय़ात मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्ह्याचा दौरा करून कोणीही आत्महत्येचा विचार करू नये, सरकार तुमच्या पाठीशी आहे अशी ग्वाही शेतकऱ्यांना दिली. चित्रपट अभिनेता नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते नारायण राणे यांनीही दौरे करून शेतकऱ्यांनी कोणत्याही स्थितीत आत्महत्येचा मार्ग स्वीकारू नये, असे आवाहन केले होते. सरकारकडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना तातडीने एक लाख रुपयांची मदत दिली जाते. मुख्यमंत्र्यांनी आता अशा कुटुंबीयांना तत्काळ िवधनविहीर मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत. असे असले तरी आत्महत्येचे सत्र सुरूच असल्याने परिस्थिती चिंतेचीच बनत चालली आहे.
रविवारी रात्री तळणेवाडी (तालुका गेवराई) येथील शेतकरी महादेव धनाजी मोहिते (वय ४५) यांनी पेटवून घेतल्यानंतर सोमवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. मोहिते यांना एक एकर शेती असून, नापिकी व कर्जबाजारीपणामुळे नराश्यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. शिरूर तालुक्यातील शिरापूर धुमाळ येथील शेतकरी मिच्छद्र किसन बाहेटे (वय ४५) यांनी सोमवारी पहाटे पुलाच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. कर्जबाजारीपणा, नापिकी यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.