X

पत्नी, दोन मुलींची हत्या करून पतीची आत्महत्या

घरगुती वादातून फुलंब्री तालुक्यातील पिंप्री येथील घटना

घरगुती वादातून फुलंब्री तालुक्यातील पिंप्री येथील घटना

घरगुती वादातून  एकाने पत्नी व दोन चिमुकल्या मुलींची हत्या करून स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना फुलंब्री तालुक्यातील पिंप्री (सातळ) येथे शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. कृष्णा तात्याराव देवरे (वय ३२), शिवकन्या कृष्णा देवरे (वय ३०), सर्वदा (वय ६) व हिंदवी (वय ५), अशी मृतांची नावे आहेत, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल आम्ले यांनी दिली.

घटनेबाबत वडोदबाजार पोलीस व स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार फुलंब्री तालुक्यातील पिंप्री (सातळ) हे आळंद ते बोरगाव रस्त्यावरील काहीसे आडवळणावरचे गाव. प्रिंप्री तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष तात्याराव देवरे यांचा कृष्णा हा सर्वात मोठा मुलगा. त्याला तीन लहान भाऊ. कृष्णा देवरे हे आपल्या आई-वडील व कुटुंबासह एकाच ठिकाणी वेगळय़ा घरात राहत होते. नेहमीप्रमाणे कृष्णा देवरे यांचे वडील व आई सकाळी उठून घराच्या पाठीमागील वाडय़ात चहा घेत होते. बराच वेळ होऊन गेला तरी कृष्णाच्या घराच्या दरवाजा उघडलेला दिसला नाही, त्यामुळे ते कृष्णा राहत असलेल्या खोलीचा दरवाजा उघडायला गेले असता त्यावर एक चिठ्ठी लावलेली आढळली. त्यामध्ये लिहिले होते ‘आधी पोलिसांना फोन करा, नंतर दरवाजा उघडा.’ तसेच चिठ्ठीवर आठ वेळेस ‘राम.. राम..’ असे लिहिले होते. तात्याराव यांनी आत डोकावून बघितले असता कृष्णा हे पत्र्याच्या आढय़ाला लटकलेल्या अवस्थेत आढळले. त्यांनी घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली.

पोलीस पाटील पांडुरंग पवार यांनी वडोदबाजार पोलिसांना कळविले. सहायक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शिवकन्याच्या डोक्यात शस्त्राचा घाव होता, तर सर्वदा, हिंदवी यांचा गळा दाबून खून केल्याचे दिसून आले. घटनेचा पंचनामा करून चारही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वदोडबजार प्राथमिक केंद्रात पाठविले. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल आम्ले यांनी घटनास्थळी पाहणी केली.

दरम्यान, कृष्णा व त्याची पत्नी शिवकन्या यांच्यात काही दिवसांपासून वाद होता. काही दिवस शिवकन्या ही सिल्लोड तालुक्यातील बोदवड येथील माहेरीही राहत होती. काही दिवसांपूर्वीच ती पुन्हा सासरी आली होती.