आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांची आर्त हाक

वडिलांनी आत्महत्या केल्यामुळे आमच्या जीवनाची झालेली होरपळ तुमच्याही मुलांच्या वाटेला येऊ देऊ नका, आत्महत्या करण्यासारखी चूक तुम्ही करू नका, असा संदेश देत ३० मुला-मुलींची दिंडी शुक्रवारी येथे दाखल झाली. या दिंडीने औरंगाबादकरांचे लक्ष वेधले. दिंडीतील मुलांनी खुलताबाद व नजीकच्या गावात जाऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वनही केले.

नाशिक जिल्हय़ातील त्र्यंबकेश्वरनजीकच्या आधारतीर्थ येथील आश्रमात आत्महत्याग्रस्त शेतककऱ्यांच्या मुले, विधवा पत्नींना आधार दिला जातो. या ठिकाणच्या ३० मुले व मुलींची शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी काढलेली दिंडी ७ जानेवारी रोजी जिजाऊ यांचे जन्मस्थान असलेले सिंदखेडराजा येथून निघाली आहे. शुक्रवारी औरंगाबादेत ही दिंडी दाखल झाली.

१५ जिल्हे व ६० तालुक्यांत जाऊन दिंडीतील मुले आत्महत्येचा विचार करणाऱ्यांना त्यापासून परावृत्त व्हावे, घरातील कर्त्यां पुरुषाने आत्महत्या केली तर मुला-मुलींची, पत्नी, आई-वडिलांची मानसिक अवस्था काय होते, याकडे लक्ष वेधत आहेत. दिंडीचा समारोप मुंबईत होणार आहे. दिंडीच्या माध्यमातून सहभागी झालेली मुले आमच्या जीवनाची होत असलेली होरपळ तुमच्या मुला-मुलींच्या वाटेला येऊ नये, यासाठी आत्महत्येसारखी चूक करू नका, असे आवाहन करीत आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदींना निवेदन देण्यात येणार आहे.