मंदिरे वाचलीच पाहिजेत. पण शेतकऱ्यांची घरे आमच्यासाठी मंदिरेच आहेत. ती आधी वाचली पाहिजेत, असा आमचा प्रयत्न सुरू आहे, असे युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे शनिवारी म्हणाले. त्यांचे हे वक्तव्य खासदार चंद्रकांत खैरे यांना टोला असल्याचे मानले जात आहे. शहरातील मंदिर पाडल्यावरून खासदार खैरे सध्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत आहेत. या पाश्र्वभूमीवर हे वक्तव्य राजकीय वर्तुळात चच्रेत आहे.
पाच हजार शेतकरी कुटुंबीयांना मदत म्हणून शिवसेनेकडून आज दिवाळी फराळाचे वाटप आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. या वेळी पालकमंत्री रामदास कदम, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची उपस्थिती होती. शहरातील चार अनाधिकृत मंदिरे प्रशासनाच्या वतीने काही दिवसांपूर्वी पाडण्यात आली. तेव्हा खासदार चंद्रकांत खैरे यांनी तहसीलदारांना शिवीगाळ केली होती. या घटनेचा संदर्भ भाषणात खैरे म्हणाले, की शिवसेनेसाठी हिंदुत्व आणि मंदिरे ही महत्त्वाची असून त्यासाठी काम करा, अशी बाळासाहेबांची शिकवण होती. त्यानुसार आम्ही मंदिर बचाव कृती समिती तयार केली आहे. याबाबत कार्यक्रमानंतर पत्रकारांनी आदित्य ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले, की शेतकऱ्यांची घरेच आमच्यासाठी मंदिरे आहेत. केवळ एवढेच नाही तर सत्ता असतानाही खासदारांवर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबतही बोलणे टाळले. यामुळे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून खैरेंना डावलले जात असल्याचा संदेश पद्धतशीरपणे दिला गेला आहे. येत्या काही दिवसांत महापालिकेतील कामाचा आढावाही आदित्य ठाकरे घेणार आहेत, हे विशेष.