शेतकरी दुष्काळ, व्यसनाधीनता किंवा वाढलेल्या गरजांमुळे मरत नसून आपल्या कुटुंबातील घटकांच्या किमान गरजाही पूर्ण करू शकत नाही, याचे शल्य बोचत असल्यामुळेच तो मरतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे जगणे सुसह्य होणारी व्यवस्था निर्माण केली पाहिजे. ती निर्माण करण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे, असे सांगताना शेतकरी बापांनो खचू नका, मरु नका, आपल्या उद्याच्या पिढीसाठी सुंदर जग निर्माण करण्यासाठी जगा, असे काळजाला हात घालणारे आवाहन शेतकरी प्रश्नांचे अभ्यासक व ‘नाम’ फाउंडेशनचे विदर्भप्रमुख हरीश इथापे यांनी केले.
कुंटूर येथे साने गुरुजी प्रबोधन व्याख्यानमाला व गंगाधरराव कुंटूरकर अमृतमहोत्सवी सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक सुरेश सावंत होते. लोक म्हणतात, दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या होतात, व्यसनाधीनतेमुळे शेतकरी मरतात. त्यांच्या गरजा अमर्याद झाल्या आहेत म्हणून ते आत्महत्या करतात. पण ही सर्व कारणे चुकीची आहेत. ती खरी असती तर १९७२च्या दुष्काळातही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असत्या. वास्तविक, व्यसनाधीनता शेतकऱ्यांपेक्षा राजकारण आणि चित्रपटसृष्टीत अधिक आहे. त्यामुळे त्या क्षेत्रातील लोकांनी अधिक प्रमाणात आत्महत्या केल्या असत्या. शेतकऱ्यांच्या गरजा वाढल्या आहेत, पण त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत व्यवस्थेनेच बंद केले आहेत, असे विश्लेषण त्यांनी केले.
याच कार्यक्रमात जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी खासदार गंगाधरराव कुंटूरकर यांचा साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर कुंटूरकर यांनी कृतज्ञता व्यक्त करताना या गावाने आपल्याला जिल्ह्यात, राज्यात ओळख दिल्याचे नमूद केले.