पाथरीतील रेणुका शुगर्सचा गळीत हंगाम सुरू करावा, या साठी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले.
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विकासाचा केंद्रिबदू असलेला गोदावरी दुधना सहकारी साखर कारखाना रेणुका शुगर्स यांनी ताब्यात घेताना २ हजार शेतकऱ्यांकडून १० हजार रुपये याप्रमाणे २ कोटी वसूल केले. २०१३-१४ च्या गळीत हंगामात अनेक भागधारक शेतकऱ्यांचा ऊस गाळपाअभावी उभा ठेवला. त्यामुळे ऊस उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. यंदाही गळीत हंगाम सुरू करण्याच्या हालचाली कारखान्याने केल्या नाहीत. यंदाही कारखाना बंद राहणार असल्याने गतवर्षी लागवड केलेला ऊस गाळपाअभावी उभा राहणार आहे. या पाश्र्वभूमीवर आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी १२ ऑक्टोबरला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. कारखाना सुरू करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला होता. कारखान्याने जमा केलेली दोन कोटी रुपयांची रक्कम व्याजासह परत करावी, अशीही मागणी त्यांनी केली. या मागण्या मान्य न झाल्यामुळे सोमवारी पाथरी तहसीलसमोर शेतकऱ्यांसह दुर्राणी यांनी लाक्षणिक उपोषण केले.
जि. प. चे शिक्षण सभापती दादासाहेब टेंगसे, बाजार समिती सभापती अनिल नखाते, सुभाष कोल्हे, अॅड. मुंजाजी भाले, चक्रधर उगले, नगराध्यक्ष जुनेद दुर्राणी, पंचायत समिती सभापती तुकाराम जोगदंड, डॉ. बाळासाहेब भोक्षे आदींसह शेतकरी मोठय़ा संख्येने सहभागी झाले. उपोषणादरम्यान कारखाना प्रशासनाने उपोषणकर्त्यांची भेट घेतली नाही, तसेच आपली भूमिका सांगण्यासही नकार दिला.