औरंगाबादमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. पैठण तालुक्यातील आपोगावच्या शिवराज सोमवारी रात्री बिबट्याच्या हल्ल्यात पिता-पुत्राचा मृत्यू झाला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या पिता-पुत्राची नावं अशोक सकाहरी औट (वय ५२) आणि कृष्णा अशोक औट (वय ३१), अशी मृतांची नावे आहेत. या वृत्ताला पैठण पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर पवार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दुजोरा दिला आहे.

मृत औट पिता – पुत्र सोमवारी रात्री शेतात गेले होते. बाप-लेकांना शेतात जाऊन बराच वेळ झाला तरी माघारी न परतल्यामुळे कुटुंबीय शेतात गेले होते. कुटुंबीयांना शेतात पिता – पुत्र मृतावस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसले. या घटनेची माहिती पैठण पोलीस व वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्यानंतर दोन्ही विभागाचे पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.

दिवाळीच्या सणांमध्ये येथील औट कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. तर आपेगावसह परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. दरम्यान गतवर्षी सुध्दा याच परिसरात एका शेतकऱ्याचा बीबट्याने बळी घेतला असल्याने परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे.

अंत्यविधी दीड तास रोखला
बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ठार झालेले पिता-पुत्र अशोक सकाहरी औट (वय 52), कृष्णा अशोक औट (वय 31) यांच्या कुटुंबीयांना वन विभागाने तातडीने मदत द्यावी, बिबट्याला तातडीने पकडावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी मृतांवरील अंत्यसंस्कार दीड तास रोखला. तहसीलदार चंद्रकांत शेळके, वन विभागाचे अधिकारी जाधव, छावा संघटनेचे अभिजित औटे, पोलीस अधिकारी घटनास्थळी होते. दरम्यान वन विभागाने एक- एक लाखाचे तर पैठण तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रत्येकी २० हजारांच्या मदतीचा धनादेश दिल्याचे अभिजित औट यांनी सांगितले.

बिबटमादी बछड्यांसह….
औट पिता – पुत्रांवर हल्ला करणारा बिबट हा मादी असून सोबत बछडेही असल्याची माहिती पुढे येत आहे. मृतांच्या पायाची बोटेही खाल्लेल्या अवस्थेत असल्याने असा प्रकार बछड्यांकडूनच होतो, असे जाणकारांचे निरीक्षण आहे. दरम्यान आपेगाव शेवगाव मार्गावर नवगावच्या शेतकऱ्यांना बिबट मादी बछड्यांसह परिसरात वावरत असल्याचे आढळून आले. अनेकांनी प्रत्यक्ष पाहिल्याचे अभिजित औट यांनी सांगितले.