इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या मुलीला उजळणी नीट म्हणता आली नाही, म्हणून पित्याने तिच्या तोंडात रागाच्या भरात कांदा कोंबल्याने गुदमरून तिचा मृत्यू झाला. भारती कुटे असे मृत मुलीचे नाव आहे. ही घटना गुरुवारी, ९ जुलै रोजी रात्री घडली. सोमवारी रात्री संजय कुटे (वय ३२) याच्याविरोधात त्याच्या पत्नीने चिकलठाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आरोपी संजय कुटे यास पोलिसांनी मंगळवारी अटक केली. औरंगाबादजवळील बाळापूर या गावात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली. भारतीला शाळेत दाखल केल्यानंतर गुरुवारी रात्री तिच्याकडून उजळणी घेताना तिने ११पर्यंतचे अंक म्हटले. मात्र, उजळणी म्हणताना तिच्याकडून १२ अंक विसरला गेला. त्यामुळे संजय कुटे यास कमालीचा राग आला. त्याने तिला चापट मारली. त्यामुळे भारती रडू लागली. आवाज मोठा होत असल्याने जवळच पडलेला कांदा संजयने उचलला आणि तिच्या तोंडात कोंबला. श्वास गुदमरल्याने ती जागेवरच कोसळली. मुलीला घेऊन संजयने बजाज रुग्णालय गाठले. तेथे तिला मृत घोषित करण्यात आले. घडलेली घटना एवढी भयंकर होती, की घाबरलेल्या संजयने घाईघाईतच तिला स्मशानभूमीत पुरले. झालेला प्रकार पत्नीने कोणाला सांगू नये म्हणून तिला संजयने दबावाखाली ठेवले. दोन दिवस तिने शब्दही उच्चारला नाही. तिची घुसमट होत होती. शेवटी पोलीस खात्यात नोकरी करणाऱ्या नात्यातील एका व्यक्तीला तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी हा प्रकार पोलिसात सांगा, असे कळविल्यानंतर मंगळवारी तिने चिकलठाणा पोलीस ठाणे गाठले आणि धाडसाने नवऱ्याविरोधात तक्रार दाखल केली. घटना कळताच तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी सुनील लांजेवार यांनी बाळापूर गाठले. जेथे मृत भारतीला पुरण्यात आले होते. तेथून तिचा मृतदेह बाहेर काढला. तिची उत्तरीय तपासणी केल्यानंतर तो अंत्यसंस्कारासाठी पुन्हा नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या दरम्यान पोलिसांनी आरोपीस अटक केली. तसेच खासगी रुग्णालयाने घडलेली घटना का कळवली नाही, याचाही तपास पोलीस करीत आहेत.