ऋतुमान बदलल्याच्या खुणा; पिकांना फटका बसण्याची भीती

सुहास सरदेशमुख

पावसाने या वर्षी दिवाळीपर्यंत मुक्काम ठोकला. थंडी  दोन-चार दिवसच जाणवली. तिचा कडाका मोजून चार दिवसांचाच. परतीच्या पावसाने तर कहर केला. हवामान बदलाचा हा फटका सर्वत्र दिसत असतानाच संक्रांत झाल्यावर  होणारी झाडांची पानगळ या वर्षी काही दिसून आलेली नाही. विदर्भ, मराठवाडय़ासह राज्यातील काही भागांत हा विचित्र बदल यंदा पाहायला मिळाला आहे

पावसाळा, हिवाळा हे ऋतुमान बदलले असल्याची चाहूल पानगळीतून दिसून येते, असे कृषी संशोधक डॉ. संजय पाटील सांगतात. ते म्हणाले,की मराठवाडय़ात मोसंबी पिकांची पानगळ व्हायला हवी होती, ती झाली नाही. त्यामुळे त्याचा परिणाम ऐन बहरात होईल आणि शेतकऱ्यांचे पुन्हा नुकसान  होईल. आंब्याचा मोहर या वर्षी जरा अधिकच आहे. पण अजूनही पिकांना आणि झाडांना पाण्यासाठी ताण सहन करावा लागत नाही. अजूनही डोंगरराईत हिरवेपणा कायम आहे. पानगळ लांबली आहे. एमजीएममधील डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम खगोल अंतराळ संशोधन केंद्राचे संचालक डॉ. श्रीनिवास औंधकर म्हणाले, ‘पंचविसावी सौरसाखळी निर्माण होण्यास पोषक वातावरण नाही. वैश्विक किरणांचा मारा वाढलेला असल्यामुळे ढगांची निर्मिती अजूनही होत आहे. इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन झोनमध्ये निर्माण झालेल्या या बदलांमध्ये हवामानात अजूनही आद्र्रता आहे. या दिवसांमध्ये साधारणत: ४० टक्के आद्र्रता असते. ती सध्या ५७ ते ६५ टक्क्य़ांच्या दरम्यान आहे. परिणाम सर्वत्र जाणवतील, पानगळ न होणे हा तेच हवामान बदलाचे एक निदर्शक आहे.’

झाले काय?

जमिनीत अजूनही आद्र्रता आहे. मध्येच ढगाळ वातावरण निर्माण होते. दोन-तीन दिवसांपूर्वी विदर्भ आणि मराठवाडय़ील काही जिल्ह्य़ांमध्ये पुन्हा पाऊस झाला. त्याचा परिणाम म्हणून पानगळ लांबली आहे.  मोसंबी आणि आंबा या दोन्ही पिकांना त्याचा फटका बसू शकतो, असे तज्ज्ञ सांगत आहेत. त्यामुळे आता चैत्रपालवी नावाचा शब्द राहतो की नाही, अशी शंका घेतली जाऊ लागली आहे.