बीट महिला हवालदारांना  ८७ दुचाकी;  नव्या कार्यशैलीने एक पाऊल पुढे

सुहास सरदेशमुख  लोकसत्ता

औरंगाबाद : १३ वर्षे पोलीस हवालदार म्हणून सविता करपे यांनी नोकरी केली. पण बहुतांश कालावधी ‘वायरलेस लेस’ यंत्राभोवती. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या इमारती बाहेरची कामे कधी तरी काम करायला मिळत. गेल्या पाच महिन्यापासून औरंगाबाद जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या कामकाजात बदल दिसू लागले असून १५-२० गावाचे क्षेत्र असणाऱ्या बीटची प्रमुख म्हणून महिला पोलीस हवालदारांकडे जबाबदारी देण्यात आली आहे. पूर्वी ही जबाबदारी केवळ पुरुष पोलीस व्यक्तींकडेच दिली जायची. त्यांनाही अडचणी जाणवायच्या तेव्हा अधून-मधून महिला पोलिसांची मदत घेतली जायची. पण आता बीटच्या जबाबदारी दिल्यानंतर  गावागावातील तक्रारीचा नव्या पद्धतीने विचार करू लागला आहे. जिल्ह्य़ातील २३ पोलीस ठाण्यातील ४४ महिलांना बीट हवालदार म्हणून काम देण्यात आले आहेच शिवाय त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात जाण्याच्या दूचाकी वाहन देण्यात आले आहे. तपासाचे चक्र वेगवान करण्यासाठी होणाऱ्या या प्रयत्नांचे आता कौतुक होऊ लागले आहे. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी स्त्री- पुरुष समानतेची नवी कार्यपद्धती विकसित करण्यास सुरुवात केली  आहे.  पुरुषी  कामे असे काही नसते ही शिकवण आता पोलीस ठाण्यातही  रुजू लागली आहे.

पोलीस खात्याची लोकाभिमूखता वाढावी म्हणून सुसंवादाच्या पातळीवर अनेक बदल होत आहेत. औरंगाबाद परिक्षेत्रातील हे बदल अधिक जाणीवपूर्वक घडविण्यसाठी विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. मलिकार्जून प्रसन्ना यांनी ठाण्यात कोणी कोठे आणि कसे बसावे येथपासून ते सर्व पोलीस ठाण्यास एकच रंग असावा असे प्रयत्न केले. आता जिल्ह्य़ातील सर्व पोलीस ठाणे पिवळया रंगाच्या आहेत. बहुतांश पोलीस ठाण्यातील मूळचे दूरध्वनी क्रमांक ‘ वाय-फाय’ ला जोडले गेले होते.  आता इंटरनेट सुविधेची व्यवस्था स्वतंत्रपणे करण्यात आली आहे. अशा अनेक छोटय़ा- मोठय़ा बदलांबरोबरच लिंगभाव समानतेने काम करण्याचे नवे प्रयत्न सुरू करण्यात आले. गेली सहा महिने यावर बारकाईने काम केले जात आहे. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. या अनुषंगाने बोलताना गंगापूर तालुक्यातील सिल्लेखाना बीटमध्ये काम करणाऱ्या सविता करपे म्हणाल्या,‘ पूर्वी गुन्’ाचा तपास, मृतदेहाचे पंचनामे करणे अशी कामे महिला पोलिसांकडे दिली जात नसे. स्वतंत्र तपास करण्याची जबाबदारी नसे. पण आता सारे बदलत आहे आणि हा बदल आमच्या जाणीवा वाढविणारा आहे.१४ गावांमधील महिलांशी संपर्क येतो.  पुरुषांशी न बोलता येणाऱ्या अनेक बाबी महिला म्हणून आमच्या सहजपणे सांगितल्या जातात. त्याचा तपासकामी उपयोग होतो. करडमाड येथील बीट पोलीस हवालदार आकांक्षा मुळे म्हणाल्या,‘ आता गावातील मुलींचा एक वॉटस् अ‍ॅप समूह तयार केला आहे. कोणालाही कोणतीही अडचण जाणवली तरी गावातील मुली  त्यांच्या समस्या सांगू शकतात. घरगुती वाद, कौटुंबिक हिंसा, बलात्कार आदी प्रकरणांमध्ये तर लक्ष घालतोच पण बीटमधील प्रत्येक घटनेनंतर काम करावायस मिळणे हे आव्हानात्मक आहे. त्यामुळे गेल्या नऊ वर्षांच्या नोकरीत जे समाधान मिळाले नाही ते आता कामातून मिळू लागले आहे. पूर्वी पोलीस ठाण्यातील इमारतीबाहेर येणाऱ्या सहकाऱ्यांच्या अडचणी कळत नसत. पण आता त्याची जाणीव होते आहे. आता एक पाऊल पुढे पडते आहे. चांगले काम करणाऱ्या महिला हवालदारांचा सत्कारही करण्यात आला.

कामाचा वेग वाढला

कामकाजात बदल करताना कर्मचाऱ्यांची सोय पाहणे महत्त्वाचे असते. महिला बीट हवालदार १२-१४ गावात फिरणार कशा असा प्रश्न होता. त्यावर उपाययोजना म्हणून दुचाकीची मागणी जिल्हा नियोजन आराखडय़ाच्या तरतुदीतून व्हावी अशी मागणी केली आणि सुभाष देसाई यांनी  ८७ दुचाकी   वाहने घेण्यासाठी मंजूरी दिली.  केवळ एवढेच नाही तर गावागावात लिंगभाव समानेतेवर काम व्हावे असे प्रयत्न आता पोलीस विभागाकडून केले जात आहेत.

खरे तर अंमलदार म्हणून महिला असो की पुरुष सर्व प्रकारची कामे करता आली पाहिजेत. जर पोलीस महासंचालक महिला असू शकते, पोलीस अधीक्षक किंवा पोलीस दलातील विविध पदावर महिला काम करत असतील तर बीट पातळीवर म्हणजे तपासकामात त्यांचा सहभाग असायला हवा हा विचार दीड- दोन वर्षांपासून डोक्यात  होता. परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रसन्ना यांच्यामुळे अंमलबजावणीतील बारकावे अधिक पुढे नेता आले. अनेक महिला पोलीस कर्मचाऱ्यास आपली नियुक्ती महिला म्हणून झाली असल्याची भावना अधिक तीव्र होती. पण काम स्त्री- पुरुषासाठी समान आहे,ही जाणीव वाढविण्यात आली. असे काम करताना चुका होतील, पण त्या जाणीवपूर्वक असणार नाहीत, अशी काळजी घेतली जात आहे. पहिल्या टप्प्यात २३ आणि नंतर ४४ महिला बीट अंमलदार म्हणून काम करू लागल्या आहेत. यामुळे पोलीस ठाण्यातील पुरुष कर्मचाऱ्यांवर असणारा ताण निष्टिद्धr(१५५)तपणे कमी झाला आहे. आता ही कार्यपद्धतीला जालना, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्य़ातही सुरू झाली आहे.

– मोक्षदा पाटील, पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण