News Flash

शिळ्या अन्नापासून खतनिर्मिती

टीका करण्याऐवजी समस्यांची सोडवणूक करणारी माणसं अधिक सरस ठरतात.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

टीका करण्याऐवजी समस्यांची सोडवणूक करणारी माणसं अधिक सरस ठरतात. औरंगाबाद शहरात उस्मानपुरा भागात राहणारे सुकुमार कुलकर्णी हे त्यापैकी एक. एका नामांकित कंपनीत अभियंते पदावरून स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतल्यानंतर शून्य कचरा निर्मितीसाठी नवीन प्रयोग हाती घेतले. कचरा सडवून त्याचे विघटन करून खत बनिण्याचे प्रयोग अनेक ठिकाणी झाले आहे. मात्र, कचरा वाळवून त्यातील पाण्याचा अंश काढून घेऊन त्याची भुकटी करण्याचा सुकुमार कुलकर्णी यांचा प्रयोग यशस्वी ठरू लागला आहे. या प्रयोगासाठी त्यांनी त्यांच्या मुलाला बरोबर घेतले आहे. ‘मुद्रा’ योजनेतून १० लाख रुपयांचे कर्ज काढून ‘वाव’ या कंपनीची त्यांनी स्थापना केली आहे.

दीड वर्षांपूर्वी स्वच्छ भारत अभियानामध्ये काम करण्याचे कुलकर्णी यांनी ठरविले. विशेषत: शिळे अन्न आणि खरकटे यातून निर्माण होणारा ओला कचरा विघटित कसा करायचा, याचे तंत्र असले तरी ते लोकांच्या उपयोगी का पडत नाही, याचा अभ्यास त्यांनी करण्याचे ठरविले. घरातच एका घंगाळ्यात शिळे अन्न टाकून तो कचरा वाळविण्याची प्रक्रिया त्यांनी हाती घेतली. एखाद्या सोसायटीत निर्माण होणारा कचरा एकत्रित केला तर तो वाळवायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला आणि तसे कंटेनर विकसित करण्याचे त्यांनी ठरविले. सुकुमार कुलकर्णी त्यांच्या कचरा कुंडय़ांना ‘वाव’ ड्रमसेट असे संबोधतात. एका लंबगोलाकार भांडय़ाला छिद्र पाडले जातात. यातून वारा खेळता राहतो. त्यामुळे कचरा वाळतो. पण त्यात काहीसा ओलसरपणा असतोच. अशा अवस्थेतील कचरा गोळा झाला की, त्याचे तुकडे करण्यासाठी एका ट्रॅक्टरला त्यांनी गिरणी लावली आहे. त्यात तो कचरा टाकून त्याचे छोटे तुकडे तयार केले की, उत्तम खत मिळते, असा दावा ते करतात. एका लंबगोलाकार डब्यात ५० किलोहून अधिक ओला कचरा ठेवता येतो. कचऱ्याच्या या कुंडय़ा अशा पद्धतीने लावल्या आहेत की, त्या सहजपणे फिरतील आणि कचरा रिकामा होईल. औरंगाबाद शहरातील काही सोसायटय़ांमध्ये कचरा निर्मूलनाचा प्रयोग त्यांनी हाती घेतला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, उद्योजक राम भोगले, मुकुंद कुलकर्णी यांनी हा प्रकल्प कार्यान्वित व्हावा यासाठी सुकुमार कुलकर्णीना मदत केली. ओल्या कचऱ्यात मांसाहारी तुकडे असतील तरी त्याचे विघटनही याच पद्धतीने करता येऊ शकते. ओला कचरा वाळविल्यानंतर त्याचे छोटे तुकडे केले की, ती एक प्रकारची सकस मातीच तयार होते. सुकुमार कुलकर्णीचे वैशिष्टय़ असे की, त्यांनी या खतामध्ये नक्की कोणकोणते सेंद्रीय तत्त्व असेल आणि ते पिकाला कसे उपयोगी पडतील, याचा अभ्यास केला आहे. एका खत निर्मिती प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीमध्ये या मातीमध्ये ७.०५६ आद्र्रता, रासायनिक कार्बनचे प्रमाण ०.१ टक्के. नायट्रोजन १.६०, फॉस्फेट ०.७०, पोटॅश ०.६२, कार्बन नायट्रोजनचे गुणोत्तर ३२.५०साठी एक असे असल्याचे त्यांना तपासणी अहवालामधून कळाले. त्यामुळे निर्माण झालेले खत त्यांनी आता पैठण तालुक्यातील काही शेतकऱ्यांना प्रयोग म्हणून दिले. परिणाम चांगले असल्याचे सांगितले जाते.

शहरातील घराघरांतून निर्माण होणारा ओला कचरा आणि त्यापासून मिळणारे खत यासाठी अत्यंत कमी साधने वापरून सुकुमार कुलकर्णीनी स्वच्छ भारत मिशनच्या उपक्रमांना नवीन उंची मिळवून दिली आहे. स्वच्छ भारत मिशनमध्ये श्रमदान करून कायमस्वरुपी उपाय होणार नाही म्हणून कुंडय़ा बदलण्यापासून ते कचरा छोटय़ा कणांमध्ये बदलण्यापर्यंत त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले. आता त्यांचा मुलगा शौमिक कुलकर्णी याच व्यवसायात रमला आहे. दिवसभरात ट्रॅक्टरवर लावलेल्या गिरणीने आठ तास काम केले तर १५ ते २० टन खत तयार होऊ शकते. आता यंत्रणांची क्षमता साडेतीनशे टन प्रतिदिनपर्यंत वाढविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. काही कंपन्यांनी त्यांचा सीएसआर या कामासाठी दिला तर ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीचा मोठा प्रकल्प करता येऊ शकेल, असा दावा  कुलकर्णी यांनी केला आहे. सध्या तयार होणारे खतासाठीचा खर्च पाच रुपये किलोपर्यंत जातो. बाजारात मिळणाऱ्या शेण खतांपेक्षा ही किंमत कमी असल्याचे कुलकर्णी सांगतात. या सगळ्या प्रक्रियेत ड्रम सेटची किंमत तुलनेने अधिक आहे. एका सोसायटीसाठी १८ हजार रुपये लागतात. १० घरांचा कचरा त्या ड्रममध्ये साठू शकतो. कचरा वाढला की, जेथे तो आहे, तेथे जाऊन ट्रॅक्टरवरील गिरणीच्या मदतीने त्याचे तुकडे करता येऊ शकतात. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2017 2:03 am

Web Title: fertilizer creation from bad food
Next Stories
1 ‘लातूर पॅटर्न’चा भ्रमाचा भोपळा!
2 शेतकरी उपाशी ठेवून बुलेट ट्रेन, समृद्धी मार्ग कशासाठी?
3 आता भाजपच्या झेंड्यावरही नरेंद्र मोदी!
Just Now!
X