गावातील विकासकामांवर विचारणा केल्यावरून दोन गटांत झालेल्या हाणामारीत महिला उपसरपंचाच्या पतीने गोळीबार केल्याने दोघे जखमी झाले. या प्रकरणी दोन्ही गटांवर वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. परभणी तालुक्यातील भोगाव साबळे येथे प्रजासत्ताक दिनी आयोजित ग्रामसभेत हा प्रकार घडला.
प्रजासत्ताक दिनी ग्रामसभा घेण्याचे सरकारचे निर्देश आहेत. त्यानुसार साबळे भोगाव येथे ग्रामसभा भरली होती. या वेळी मनरेगाच्या कामावरून सत्ताधारी आणि विरोधी गटांत वादावादी सुरू झाली. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्याचे सुरू असतानाच उपसरपंच आशामती राऊत यांचा पती मनोज राऊत याने स्वतच्या पिस्तुलातून दोन गोळ्या झाडल्या. यात बाबाराव रुस्तुमराव साबळे व अन्य एकाच्या शरीराला गोळी चाटून गेल्याने ते जखमी झाले. या दोघांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या प्रकरणी बाबाराव साबळे यांच्या तक्रारीवरून मनोज राऊत याच्यावर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. दुसरी तक्रार सरपंच बायनाबाई कठाळू पुंडगे यांनी दिली. ध्वजवंदन करीत असताना आरोपी कल्याण रामराव साबळे, अर्जुन रामराव साबळे व अन्य काहींनी तू दलित आहेस व ध्वजवंदन करून ग्रामसभा का घेतली, असे म्हणत काठी व दगडाने मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीवरून कल्याण साबळे आणि अर्जुन साबळे या दोघांवर अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला. दोन्ही गटांतील आरोपींना पोलिसांनी अटक केली. ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर रेड्डी यांनी गावास भेट दिली.