लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेच्या विभागीय अंतिम फेरीसाठी औरंगाबाद विभागातून ५ संघ बुधवारी निवडण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नृत्यशास्त्र विभागाची ‘भक्षक’, नाटय़शास्त्र विभागाची ‘देवदासी’, बीडच्या एस. के. एस. महाविद्यालयाची ‘भोग’, तसेच जळगाव येथील मुळजी जेठा महाविद्यालयाची ‘साधुच्या डोहात’ व रायसोनी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटच्या ‘आसुसलेला दोरखंड’ या एकांकिका विभागीय अंतिम फेरीत दाखल झाल्या आहेत. त्यांचे सादरीकरण ६ ऑक्टोबर रोजी होईल.
सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत व पृथ्वी एडिफिस यांच्या सहकार्याने आयोजित लोकसत्ता-लोकांकिका स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी स्पर्धकांमध्ये दांडगा उत्साह होता. वेशभूषा आणि नेपथ्याला लागणारे साहित्य काही संघांनी अक्षरश: टेम्पोतून आणले होते. विशेषत: खान्देशातून आलेल्या संघाने स्पर्धेसाठी जय्यत तयारी केली होती. सकाळी साडेनऊ वाजता पहिला संघ सादरीकरणासाठी तयार होता.
प्राथमिक फेरीत एकूण १५ एकांकिका सादर करण्यात आल्या. मंगळवारी मराठवाडा व खान्देशातून नाटय़जागरासाठी आलेल्या ८ संघांनी एकांकिका सादर केल्या. सतत पडणारा दुष्काळ, लैंगिक विकृतीचे प्रश्न, त्यात महिलांची होणारी फरपट, अंधश्रद्धा यासह नातेसंबंधांवर प्रकाश टाकणाऱ्या संहिता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हाताळल्या.
संघ वेळेत पोहोचला का, त्याचे सादरीकरण ठरवून दिलेल्या वेळेतच झाले का आणि तत्पूर्वी त्यांनी तयारीसाठी घेतलेला वेळ याची मोठी कसरत दिवसभर सुरू होती. परीक्षक अमेय उज्ज्वल व पद्मनाभ पाठक यांनी केलेल्या परीक्षणानुसार निवड झालेल्या ५ संघांची घोषणा करण्यात आली. ‘लोकसत्ता’चे मुख्य वितरण व्यवस्थापक मुकुंद कानिटकर, मुख्य जाहिरात व्यवस्थापक संदीप ऋषी, आयरिस प्रॉडक्शन हाऊसचे अभय परळकर यांची या वेळी उपस्थिती होती. नाटय़चळवळीशी संबंधित शहरातील जाणकारांनी या स्पर्धेला आवर्जून हजेरी लावली.