20 October 2019

News Flash

बालविवाह करून मुलीचा छळ; पाचजणांना सक्तमजुरी

६ जुलै २०१५ रोजी अग्रवालच्या घरात तिचा मुख्य आरोपी संजय याच्याशी विवाह लावण्यात आला होता.

प्रतिनिधिक छायाचित्र

मिसारवाडीतील घटना

औरंगाबाद : मिसारवाडीतील विक्री केलेल्या तेरा वर्षीय मुलीचा बालविवाह लावून दिला. त्यानंतर तिच्याबाबत माणुसकीला लाजवणारे कृत्य करणाऱ्या अग्रवाल कुटुंबातील एकाला दहा वर्षे तर चारजणांना पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा विशेष न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी सुनावली, तर सातजणांची निदरेष मुक्तता करण्यात आली.

संजय वीरेंद्रकुमार अग्रवाल याला दहा वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा तर त्याचे साथीदार आशा वीरेंद्रकुमार अग्रवाल, दीपा वीरेंद्रकुमार अग्रवाल, सागर वीरेंद्रकुमार अग्रवाल, शरद ऊर्फ अतुल वीरेंद्रकुमार अग्रवाल या चारजणांना पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. आरोपी अटकेपासून कारागृहात होते.

मूळच्या अंबाजोगाई तालुक्यातील पीडितेच्या आईसोबत त्यांचा चुलत भाऊ अशा दोघांची तीन वर्षांपूर्वी सुवर्णा वंजारे हिच्याशी परभणी रेल्वेस्थानकावर ओळख झाली होती. तेव्हापासून सुवर्णा दोघांच्या वारंवार संपर्कात होती. पीडितेची विक्री करण्याचा कट दलाल असलेल्या सुवर्णा, सुरेखा, पवार, धुराजी सुखदेव सूर्यनारायण, लातूर येथील मानधने आणि छाया नावाच्या महिलेने रचला होता. त्यांनी अग्रवाल कुटुंबाशी संपर्क साधला. त्यानंतर पीडितेच्या आईला शहरात बोलावून घेतले होते. पीडितेसाठी अग्रवालचे स्थळ आल्याचे पवारने तिच्या आईला सांगितले होते. त्यानुसार आईसोबत पीडिता आणि जावई यांच्यासह ५ जुलै २०१५ रोजी शहरात आल्या होत्या. मुलगी पाहून साखरपुडा आदी कार्यक्रम उरकून घेत ६ जुलै २०१५ रोजी अग्रवालच्या घरात तिचा मुख्य आरोपी संजय याच्याशी विवाह लावण्यात आला होता.

लग्नानंतर छळ, बालविवाह आदींबाबतची तक्रार दिल्यानंतर सिडको पोलीस ठाण्यात अग्रवाल कुटुंबीयांसह बाराजणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक राजकुमार पाडवी यांनी अडीच हजार पानांचे दोषरोपपत्र न्यायालयात सादर केले. सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता बाळासाहेब महेर यांनी १३ साक्षीदारांचे जबाब नोंदविले होते.

सातजणांची निर्दोष मुक्तता

प्रकरणात सुवर्णा वंजारे, सुरेशा बावने, छाया जाधव, आशा सोनवणे, सुखदेव सूर्यनारायण, विठ्ठल पवार व रघुनाथ मानधने यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. या प्रकरणात अ‍ॅड. प्रकाश उंटवाल यांनी काम पाहिले.

First Published on April 23, 2019 12:53 am

Web Title: five man gets jail for child marriage